कऱ्हाड : एकाच झाडाला आणि एकाच साडीने गळफास घेऊन महिलेसह मुलीने आत्महत्या केली. कऱ्हाड शहरानजीक टेंभू गावामध्ये शनिवारी सकाळी साडेअकराच्या सुमारास ही घटना उघडकीस आली. संबंधित महिला व मुलीची ओळख रात्री उशिरापर्यंत पटली नव्हती. मात्र, घटनास्थळी आढळलेल्या पुराव्यांवरून त्या दोघी सातारा परिसरातील असण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. कऱ्हाडपासून सुमारे पाच किलोमीटर अंतरावर टेंभू गाव वसले असून, ओगलेवाडीतील रेल्वे स्टेशनपासून या गावाकडे जाण्यासाठी रस्ता आहे. या रस्त्यानजीकच ‘मुळुकाचा बिघा’ नावचे शिवार आहे. या शिवारात नेहमीच शेतकऱ्यांची वर्दळ असते. शनिवारी सकाळीही काही ग्रामस्थ या शिवारात गेले होते. त्यावेळी भोकरीच्या झाडाला एक महिला व मुलीचा मृतदेह लटकत असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. ग्रामस्थांनी ही माहिती कऱ्हाड तालुका पोलिसांना दिली. पोलिस अधिकारी व कर्मचारीही तातडीने त्याठिकाणी दाखल झाले. संबंधित महिला व मुलीने एकाच साडीच्या दोन टोकांनी झाडाच्या फांदीला गळफास घेतल्याचे पोलिसांना दिसून आले. घातपाताची शक्यता असल्याने पोलिसांनी घटनास्थळाची बारकाईने पाहणी केली. मात्र, त्या अनुषंगाने काहीही पुरावे पोलिसांच्या हाती लागले नाहीत. परिसरात पाहणी केली असता पोलिसांना एक पर्स आढळून आली. त्यामध्ये मोबाईलचा चार्जर व एसटीचे तिकीट सापडले. संबंधित तिकीट ३१ मार्च रोजीचे सातारा ते कऱ्हाड प्रवासाचे व दोन प्रवाशांचे आहे. त्यामुळे ते तिकीट संबंधित महिला व मुलीचेच असण्याची दाट शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. पर्समध्ये पोलिसांना चार्जर आढळला. मात्र, मोबाईल आढळला नाही. त्यामुळे महिला व मुलीची ओळख पटविण्यात पोलिसांना अडचणी येत आहेत. या पर्ससोबतच एक प्रवासी बॅग असून, त्या बॅगेमध्ये मुलीचे कपडे व काही साड्या आहेत. त्याव्यतिरिक्त ओळख पटण्यासारखा कोणताही पुरावा पर्स अथवा बॅगेमध्ये पोलिसांना आढळून आला नाही. संबंधित महिला व मुलीच्या शरीरावर कसलीही जखम अथवा व्रण नाहीत. त्यामुळे दोघींनी आत्महत्या केल्याचे प्रथमदर्शनी दिसत आहे. मात्र, ओळख पटल्याशिवाय आणि शवविच्छेदन अहवाल प्राप्त झाल्याशिवाय मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होणार नसल्याचे पोलिसांनी सांगितले. याबाबतची नोंद कऱ्हाड तालुका पोलिस ठाण्यात झाली आहे. तळहातावर मेहंदी; मनगटावर गोंदण गळफास घेतलेल्या स्थितीत आढळलेल्या महिलेचे वय सुमारे ४५ वर्षे तर मुलीचे वय १७ ते १८ वर्षे असावे. महिलेच्या मनगटानजीक इंग्रजीतील ‘एस’ अक्षर गोंदले आहे. तसेच मुलीच्या डाव्या तळहातावर मेहंदी आहे. दोघींच्या पेहरावावरून त्या मोलमजुरी करणाऱ्या कुटुंबातील असण्याची शक्यता आहे. तसेच महिलेच्या पायावर सिमेंटच्या धुरळ्याचा व्रण दिसून येत असल्याने त्या बांधकाम व्यवसायात मजूर असाव्यात, असाही पोलिसांचा कयास आहे.
एकाच साडीने दोघींचा गळफास!
By admin | Published: April 03, 2016 3:49 AM