कोल्हापूर : गेल्या नऊ महिन्यांपासून अंबाबाई भक्त, पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समिती व कोल्हापूरकरांचे लक्ष लागून राहिले होते त्या मणिकर्णिका कुंडाचा तळ गुरुवारी लागला. कुंडाचा १४ बाय १८ आकाराचा चौकोनी तळ प्रकाशात आला असून त्यात सध्या परिसरातील तीन गटारींचे पाणी मिसळत आहे. या पाण्याचा उपसा सुरू असला तरी गटारींचे पाणी बंद करणे गरजेचे आहे तोपर्यंत पाण्याचे उमाळे नेमके कुठून येत आहेत हे कळणार नाही व कुंडातील पाणी स्वच्छ राहणार नाही.करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिर आवारातील मणिकर्णिका कुंडाच्या खुदाईचे काम गेल्या नऊ महिन्यांपासून सुरू आहे. कोणत्याही मशीनरींचा वापर न करता केवळ पाटी व खोऱ्याने ४० फूट खोल असलेल्या या कुंडाची खुदाई होत असली तरी सध्या कामाने गती घेतली आहे. गेली कित्येक महिने कुंडातील भराव काढण्यात गेले. मात्र इतके दिवस झालेल्या श्रमाचे फलित म्हणून बुधवारी सायंकाळी कुंडाचा तळ लागला.
मात्र सध्या यात महापालिकेची सरलष्कर भवन येथून आलेल्या गटारींचे पाणी, माऊली लॉजच्या गटारींचे लिकेजचे पाणी, मंदिर आवारातील पाणी आणि जोतिबा रोडवरील इमारतीत मुरलेले पाणी मिसळत आहे. त्यादिवसापासून येथील पाण्याचा उपसा केला जात असून रात्रीत पुन्हा पाणी भरत आहे. गटारींचे पाणी कुंडात मिसळणे बंद होत नाही तोपर्यंत कुंडात पाणी नेमके कुठून येते, झरे जिवंत झाले आहेत, पाण्याचे उमाळे कुठे आहेत याचा शोध लागणार नाही.महापालिकेची दिरंगाई... देवस्थानचा इशारामहापालिकेने नागरी वस्तीतील ड्रेनेजची, गटारींची पाईपलाईन पूर्व दरवाज्यातून मंदिरात आणली आहे. हे घाण पाणी कुंडात मिसळत असून गेल्या नऊ महिन्यांपासून देवस्थान समितीने वारंवार मागणी करूनदेखील ही पाईपलाईन पूर्व दरवाज्याबाहेरून वळवण्यात आलेली नाही. याबाबतच्या प्रस्तावावर आयुक्तांची सही होऊनही महपालिकेने निविदा काढलेली नाही. यावरून वाद झाल्यानंतर समितीने तुम्ही पाईपलाईन वळवणार नसाल तर आम्ही मंदिरातून ती बंद करू, पुढे पाणी तुंबले, नागरिकांना त्रास झाला तर त्याला देवस्थान जबाबदार नाही, असा इशारा दिला आहे.किमान दहा फूट पाणीसध्या कुंडातील पाण्याची पातळी ३ फूट आहे. भालजी पेंढारकर यांच्या आत्मचरित्रात ते घाटी दरवाजा येथून उडी मारून कुंडात पोहायचे असा उल्लेख आहे. कुंडाच्या चौकोनाबाहेर आणखी किमान ७ फूट वरपर्यंत कुंडाचे पाणी होते, असा अभ्यासकांचा अंदाज आहे.