सीमाबांधवांच्या प्रश्नी संसदेत आवाज उठविणार, खासदार अमोल कोल्हेंची ग्वाही
By ऑनलाइन लोकमत | Published: February 21, 2022 02:59 PM2022-02-21T14:59:06+5:302022-02-21T14:59:50+5:30
न्यायालयातील निकाल कधी लागायचा तो लागू दे, तोपर्यंत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लक्ष घालून तोडगा काढण्याबत पवार यांना विनंती करावी, असे सीमावासीयांनी कोल्हे यांना सांगितले.
कोल्हापूर : सीमाभागातील मराठी बांधवांच्या समस्या व प्रश्नांविषयी संविधानिक मार्गाने संसदेत आवाज उठवू, अशी ग्वाही खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी दिली. बंगळुरू येथे छत्रपती शिवरायांना मानवंदना देऊन परतताना महाराष्ट्र एकीकरण समितीच्या पदाधिकाऱ्यांची भेट घेतली, त्यावेळी ते बोलत होते.
बंगळुरू येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना झाल्यावर दोषींवर कारवाई करावी आणि शिवरायांच्या पुतळ्याला दुग्धाभिषेक करावा या मागणीसाठी आंदोलन करणाऱ्या मराठी बांधवांना कर्नाटक सरकारने ४७ दिवस तुरुंगात डांबून ठेवले. त्यामुळे सीमाभागात प्रचंड संतापाची भावना होती. त्यामुळे बंगळुरू येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला दुग्धाभिषेक खासदार कोल्हे यांच्या हस्ते घालण्यात आला.
विशेष म्हणजे रात्री बारा वाजण्याच्या सुमारास पुण्याकडे परतत असताना महाराष्ट्र एकीकरण समितीच्या पदाधिकाऱ्यांनी खासदार डॉ. कोल्हे यांचा सत्कार करताना सीमाभागातील मराठी बांधवांवर होणाऱ्या अन्यायाचा व अडचणींचा पाढा वाचला. यावेळी माजी महापौर मालोजी अष्टेकर, रमाकांत कोंडूसकर, अमित देसाई, पीयूष हवल, सागर पाटील, बळवंत शिंदोलकर, विकास कलगड, प्रकाश मरगाळी, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख आणि इतर मान्यवर उपस्थित होते.
पंतप्रधानांनी लक्ष घालण्यासाठी प्रयत्न करा
काही सीमावासीय मराठी बांधवांनी रात्री साडेबारा वाजता खासदार कोल्हे यांना थांबवून सत्कार केला. सीमाभागातील माणसाला ज्येष्ठ नेते शरद पवारच न्याय देऊ शकतात, न्यायालयातील निकाल कधी लागायचा तो लागू दे, तोपर्यंत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लक्ष घालून तोडगा काढण्याबत पवार यांना विनंती करावी, असे सीमावासीयांनी कोल्हे यांना सांगितले.