कोल्हापूर : पेट्रोल, डिझेलची दरवाढ, घरगुती गॅस, खाद्यतेलांसह जीवनावश्यक वस्तूंची महागाई वाढत असताना झोपेचं सोंग घेणाऱ्या केंद्र सरकारला व राज्य सरकारला जाग आणण्यासाठी अखिल महाराष्ट्र कामगार-कर्मचारी संघाच्या कार्यकर्त्यांनी साष्टांग दंडवत घालत येत जिल्हा प्रशासनाला निवेदन दिले.
कोरोनामुळे गेल्या दीड वर्षांपासून कमाई नाही, नोकरी, व्यवसाय उद्योग बंद असताना सर्व प्रकारच्या महागाईने उच्चांक गाठला आहे, ऑफलाईन शिक्षण बंद होऊन ऑनलाईन शिक्षण सुरू असताना आपल्या मुलांना स्मार्ट फोन देता येत नसल्याने अनेकजणांनी आत्महत्या केली. कष्टकरी पालकांना आपल्या मुलांचे शैक्षणिक आयुष्य संपले की काय अशी भीती वाटत आहे. एखादी इच्छा पूर्ण व्हावी किंवा त्रास कमी व्हावा यासाठी परंपरा म्हणून देवाला दंडवत घातले जाते, महागाईला कंटाळलेल्या सर्वसामान्य नागरिकांच्या वतीने सरकारला जाग आणण्यासाठी साष्टांग दंडवत घालून महागाई कमी करण्यासाठी साकडे घालत आहोत. कष्टकरी वर्गाला उपाशी मरण्यापेक्षा आत्महत्या करुन मरण्याची वेळ येऊ देऊ नये म्हणून महागाई तत्काळ कमी करण्यात यावी अशी मागणी निवेदनात करण्यात आली. यावेळी शहराध्यक्ष भारत कोकाटे, जिल्हाध्यक्ष संजय गुदगे, समाधान बनसोडे, फरजाना नदाफ, शबाना मुजावर, अर्जुन वाघमारे विजय गायकवाड यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.
---
फोटो नं १६०७२०२१-कोल-कामगार संघ
ओळ : कोल्हापुरातील अखिल महाराष्ट्र कामगार-कर्मचारी संघाच्या वतीने शुक्रवारी महागाई वाढत असताना झोपेचं सोंग घेतलेल्या सरकारला जाग यावी यासाठी दंडवत घालत येत जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदन देण्यात आले.
---