कोल्हापूर : मीटर प्रमाणे भाडे न घेणे, प्रवाशांना उद्धट वागणूक देणे, आदी तक्रारींवरून प्रादेशिक परिवहन कार्यालयाने मध्यवर्ती बसस्थानक परिसरात मंगळवारी सकाळी रिक्षांची तपासणी केली. त्यात दहा रिक्षांच्या मीटरमध्ये दोष आढळल्यानतंर त्यांच्यावर कारवाईचा बडगा उगारण्यात आला. या कारवाईमुळे रिक्षाचालकांत खळबळ माजली.सोमवारी (दि.१८)रोजी जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेची बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात झाली. यात सदस्यांनी जिल्हाधिकारी दौलत देसाई यांच्यासमोर शहरातील रिक्षाचालक प्रवाशांना उद्धट वागणूक देतात.
मीटरप्रमाणे भाडे आकारणी करीत नाहीत. थांब्यावरून जवळचे अंतराचे भाडे नाकारणे, . ठोक पद्धतीने भाडे आकारणी करणे, ग्राहकांबरोबर अरेरावीची भाषा करणे,अशा विविध तक्रारींचा पाढा वाचला. याबाबत तात्काळ जिल्हाधिकारी देसाई यांनी प्रादेशिक परिवहन व शहर वाहतुक पोलीसांना रिक्षाचालकांवर कारवाईचे आदेश दिले. त्यानूसार प्रादेशिक परिवहन अधिकारी डॉ. स्टिव्हन अल्वारीस यांच्या मार्गदर्शनखाली मोटारवाहन निरीक्षक सुभाष देसाई व त्यांच्या पथकाने मंगळवार सकाळपासूनच मध्यवर्ती बसस्थानक परिसरातील रिक्षांची तपासणीस सुरूवात केली. त्यात मीटर सुरू नसलेल्या व सील नसलेल्या, गाडीचा फिटनेस नाही, परमीट नाही, पीयुसी नाही, गाडीचा विमा नाही, वाहन चालविण्याचा परवाना नाही, असा दोष आढळला. त्यानूसार अमित बाटुंगे, अशिष कांबळे, अस्लम बारगीर, सतीश कोरवी, सचिन कडुस्कर, अविनाश देसाई, सागर गावडे, दगडू गोडेकर, प्रशांत माने, आत्माराम देशमुख या रिक्षाचालकांवर कारवाईचा बडगा उगारण्यात आला. ही कारवाई शहरात यापुढेही सुरू ठेवली जाणार आहे. नागरीकांनी अशा रिक्षाचालकांबाबत प्रादेशिक परिवहन कडे तक्रार करावी. असे आवाहन मोटार वाहन निरीक्षक देसाई यांनी केले आहे.