कोल्हापूर : हृदयविकाराचा झटका आलेल्या आईच्या सेवेसाठी सीपीआरमध्ये थांबलेला मुलगा संतोष मनोहर गवरे (वय ४५, रा.कसबा बावडा, कोल्हापूर) यांचा झोपेतच हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. ही घटना मंगळवारी (दि. २०) सकाळी नऊच्या सुमारास सीपीआरमधील वेदगंगा इमारतीजवळ उघडकीस आली. आईची काळजी करणाऱ्या मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त होत आहे.याबाबत अधिक माहिती अशी की, कसबा बावड्यातील संकपाळनगरात राहणाऱ्या लीलाबाई मनोहर गवरे (वय ६५) यांना सोमवारी (दि. १९) सकाळी हृदयविकाराचा सौम्य झटका आला. अस्वस्थ वाटू लागल्याने, मुलगा संतोष यांनी आईला सीपीआरमध्ये दाखल केले. बहिणीसोबत संतोष आईची शुश्रूषा करीत होते. सोमवारी रात्री त्यांनी स्वत:च्या हाताने आईला जेवू घातले. त्यानंतर, ते वेदगंगा इमारतीजवळ मुकादम कार्यालयाजवळ झोपी गेले. सकाळी नऊ वाजले, तरी ते उठले नसल्याने, सफाई कर्मचाऱ्यांनी त्यांना उठविण्याचा प्रयत्न केला. कोणताच प्रतिसाद मिळत नसल्याने, त्यांना सीपीआरच्या अपघात विभागात दाखल केले. मात्र, उपचारापूर्वीच त्यांचा हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी स्पष्ट केले.संतोष यांचे लग्न झाले नव्हते, त्यामुळे आई आणि ते असे दोघेच घरात राहत होते. एकमेकांना अधार असलेल्या माय-लेकाला हृदयविकाराने गाठले. यात मुलगा संतोष यांचा दुर्दैवी मृत्यू झाल्यामुळे हळहळ व्यक्त होत आहे.
आईच्या सेवेसाठी रुग्णालयात थांबला, झोपेतच मुलाचा मृत्यू झाला; कोल्हापुरातील दुर्दैवी घटना
By ऑनलाइन लोकमत | Published: June 21, 2023 3:57 PM