लोकमत न्यूज नेटवर्ककडेगाव : कडेगाव येथे दारुबंदीसाठी ३ आॅगस्ट रोजी झालेल्या सह्यांच्या पडताळणीत १ हजार ३३९ सह्यांची पडताळणी झाली असताना, १ हजार २५१ सह्यांची पडताळणी झाली असल्याचा अहवाल जिल्हाधिकाºयांना सादर करण्यात आला आहे. सह्यांच्या आकडेवारीत गोलमाल झाल्याबद्दल तक्रार करीत संतप्त महिलांनी फेरपडताळणीवर बहिष्कार टाकला आहे.येथील महिलांच्या मते पहिल्याच पडताळणीत ८८ सह्यांचा गोलमाल राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाºयांनी केला आहे. ३ आॅगस्ट रोजी झालेल्या या पडताळणीचा निकाल न देताच, सोमवार दि. १८ आॅगस्ट रोजी फेरपडताळणी घेणार असल्याचा निर्णय उत्पादन शुल्क विभागाने घेतला आहे. या निर्णयाविरुद्ध दारूबंदी चळवळीतील कार्यकर्त्यांनी व संतप्त महिलांनी निषेध व्यक्त करून, सह्यांच्या पडताळणीवर बहिष्कार घातला आहे. दरम्यान, सह्यांच्या पडताळणीत झालेल्या गैरप्रकाराची चौकशी करावी, अशी मागणी कडेगाव येथील दारूबंदी चळवळीतील महिलांनी निवेदनाद्वारे जिल्हाधिकाºयांकडे केली आहे .कडेगाव येथे मनमानी कारभार करून उत्पादन शुल्क विभाग दारूबंदी चळवळीचा आवाज दाबून टाकण्याचा प्रयत्न करीत आहे, असा संताप कडेगाव शहरातील दारूबंदी चळवळीतील महिला वर्गातून व्यक्त होत आहे. दारूबंदीसाठी मोर्चे, आंदोलने केली. ३ आॅगस्ट रोजी महिलांच्या सह्यांची पडताळणी झाली. १ हजार ३३९ महिला सह्यांच्या पडताळणीसाठी उपस्थित राहिल्या. त्यापैकी १ हजार १८९ महिलांच्या सह्या बिनचूक ठरल्या, तर दारूबंदीसाठी (आडवी बाटली) मतदान होणार होते. परंतु उत्पादन शुल्क विभागाने सह्यांच्या पडताळणीचा अधिकृत निकाल जाहीर केला नाही. त्याचे चित्रीकरणही दारूबंदी चळवळीतील कार्यकर्त्यांकडे आहे. तरीही आता अचानक १,३३९ नव्हे, तर १,२५१ महिलांच्या सह्यांची पडताळणी झाली असल्याचा अहवाल राज्य उत्पादन शुल्क विभागाने जिल्हाधिकाºयांना सादर केला आहे. ३ आॅगस्टच्या फेरपडताळणीत गोलमाल करून, आता १८ सप्टेंबरला महिलांच्या सह्यांची फेरपडताळणी घेण्याचा निर्णय उत्पादन शुल्क विभागाने कडेगाव येथील दारूबंदी चळवळीवर लादला आहे. त्यामुळे चळवळीतील कार्यकर्ते व महिलांनी फेरपडताळणीवर बहिष्कार घातला आहे.उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने ९ ऐवजी ९-४५ वाजता सह्यांची पडताळणी सुरू केली होती. पाऊण तास उशिरा पडताळणी प्रक्रिया सुरू झाल्याने पडताळणीसाठी आलेल्या महिला थांबू शकल्या नाहीत. यात अनेक मोलमजुरी व नोकरी करणाºया महिलांचा समावेश होता. तरीही १ हजार ३३९ सह्यांची पडताळणी झाली, असे उत्पादन शुल्कच्या अधिकाºयांनी सांगितले होते.यापैकी १ हजार १८९ महिलांच्या सह्या बिनचूक झाल्या, तरी दारूबंदीसाठी मतदान प्रक्रिया राबविता येते. परंतु तरीही राज्य उत्पादन शुल्क विभागाने सह्यांच्या पडताळणीचा निकाल अद्याप जाहीर केलेला नाही. सह्यांच्या पडताळणीचा निकाल जाहीर करावा, यासाठी दिनांक १९ आॅगस्ट रोजी कडेगावमध्ये कडकडीत बंद पाळण्यात आला. यावेळी प्रांताधिकारी यांना महिलांचे निवेदन दिले होते.याशिवाय सोमवार दि. २१ आॅगस्ट रोजी महिलांनी जिल्हाधिकारी विजय काळम-पाटील यांची भेट घेऊन सह्यांच्या पडताळणीचा निकाल जाहीर करून दारूबंदीसाठी मतदान प्रक्रिया राबविण्यात यावी, या मागणीचे निवेदन दिले होते. आता ८८ सह्यांचा गोलमाल झाला असल्याची तक्रार झाल्यामुळे राज्य उत्पादन शुल्कचा गैरकारभार चव्हाट्यावर आला आहे.
कडेगावात सह्यांच्या फेरपडताळणीवर बहिष्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 18, 2017 1:10 AM