कोल्हापूर : शनिवारी झालेल्या राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये येथील वकील कामकाजापासून अलिप्त राहिल्याने त्यांचा बहिष्कार कायम असल्याचे यावेळी दिसून आले. टाऊन हॉल येथील जिल्हा व सत्र न्यायालयात या राष्ट्रीय लोकअदालतीसाठी आलेल्या बहुसंख्य पक्षकारांनी अदालतीमध्ये सहभागी न होता, त्यांना पाठविलेल्या नोटिसा त्यांनी वकिलांना यावेळी दिल्या. यावेळी वकिलांनी पक्षकारांना फुले देऊन आभार मानले. मुंबई उच्च न्यायालयाचे कोल्हापुरात सर्किट बेंच व्हावे, ही तीन दशकांहून अधिक मागणी आहे. कोल्हापूरसह रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सांगली, सातारा व सोलापूर या जिल्ह्यांतील वकिलांनी या राष्ट्रीय लोकअदालतीच्या कामकाजात सहभागी होऊ नये, असे आवाहन खंडपीठ कृती समितीने केले होते. त्यानुसार वकिलांनी कामकाजात सहभाग घेतला नाही; पण समितीचे निमंत्रक तथा कोल्हापूर जिल्हा बार असोसिएशनचे अध्यक्ष राजेंद्र चव्हाण यांच्यासह वकील बांधव जिल्हा व सत्र न्यायालयाच्या आवारात सकाळी दहापासून ते दुपारपर्यंत बसून होते. यावेळी लोकअदालतीसाठी येथे आलेल्या बहुतांश पक्षकारांनी आपल्या नोटिसा वकिलांना देत कोल्हापुरात सर्किट बेंचप्रश्नी लढ्यामध्ये आपणही सहभागी असल्याचे सांगितले. यावेळी सेके्रटरी अॅड. रवींद्र जानकर, अॅड. दिगंबर पाटील, अॅड. सुशीला चव्हाण, अॅड. अनिलकुमार गोडे, अॅड. इंदिरा राजेपांढरे, अॅड. माणिक शिंदे, अॅड. पल्लवी थोरात, अॅड. अभिजित जोशी यांच्यासह वकील उपस्थित होते. दरम्यान, राष्ट्रीय लोकअदालतीवेळी कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी येथे लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचाऱ्यांचा बंदोबस्त होता. (प्रतिनिधी)
राष्ट्रीय लोकअदालतीमध्ये कोल्हापूरसह इतरही जिल्ह्यांतील वकील कामकाजापासून अलिप्त राहिले. त्यामुळे या अदालतीवर वकिलांचा बहिष्कार कायम आहे, हे दिसून येते. - राजेंद्र चव्हाण, निमंत्रक खंडपीठ कृती समिती, कोल्हापूर.