तासगाव : धुळगाव (ता. तासगाव) येथील भगतसिंंह अण्णासाहेब डुबल यांनी आईच्या मृत्यूनंतर कार्याचा विधी सातव्या दिवशी केला, या कारणावरुन धुळगाव (ता. तासगाव) येथील भगतसिंंह डुबल यांच्या कुटुंबाला त्यांच्या भावकीने वाळीत टाकले. सार्वजनिक कार्यक्रमांतून बहिष्कृत करुन त्यांना त्रास दिला जात आहे. हा प्रकार आठ महिन्यांपासून सुरु असून तक्रारदार डुबल यांनी सहा जणांविरोधात तासगाव पोलिसांत तक्रार दिली आहे.पोलिसांत दिलेल्या तक्रारीनुसार, भगतसिंंह डुबल हे आई, वडील, पत्नी, मुलगी यांच्यासोबत राहतात. त्यांचे दहावीपर्यंत शिक्षण झाले आहे. पत्नी पदवीधर, तर मुलगी संगणक अभियंता आहे. सर्व कुटुंब सुशिक्षित आहे. डुबल यांच्या आईला दम्याचा विकार होता. २६ एप्रिल २०१५ रोजी त्यांच्या आईची प्रकृती अचानक खालावली आणि त्यांचा मृत्यू झाला.डुबल यांच्या आईने मृत्युपूर्वी, ‘मृत्यूनंतरचे विधी पारंपरिक पध्दतीने न करता, पाचव्यादिवशीच दहाव्याचे विधी करावेत’, असे सांगितले होते. त्यानुसार पाचव्या दिवशी दहाव्याचा विधी केला, तर बाराव्या दिवशी करण्यात येणारा कार्याचा विधी सातव्या दिवशी केला. डुबल यांनी भावकीला न जुमानता हा नवा पायंडा सुरु केला. त्यामुळे त्यांच्या भावकीने २६ एप्रिलपासून त्यांना भावकीतून बहिष्कृत केले. शारीरिक, मानसिक त्रास देणे, समाजाच्या कार्यक्रमाला न बोलावणे, घरातील कार्यक्रमाला येऊ न देणे, मुलीच्या लग्नात विघ्न आणून ते लग्न मोडण्याचा प्रयत्न करणे, यांसह अनेक प्रकारचा त्रास या कुटुंबाला सहन करावा लागत असून, अमृतराव सुबराव डुबल, सूर्याजीराव रामराव डुबल, माधवराव मालोजीराव डुबल, जगन्नाथ आप्पासाहेब डुबल, अशोक वसंतराव डुबल, अभिमन्यू जयसिंंगराव डुबल या सहा जणांविरोधात त्यांनी तक्रार दिली आहे. (वार्ताहर)निवेदन : समाधानासाठी फटके मारा...आठ महिन्यांपासून वाळीत टाकल्याचा त्रास आमच्या कुटुंबाला सहन करावा लागत आहे. भावकीकडून भेदभावाचे विष पेरले जात आहे. या लोकांकडून आमच्या जीवितास धोका आहे. त्यांच्या समाधानासाठी ग्रामपंचायतीसमोर आम्हाला फटके मारावेत, अशी सूचना त्यांनी निवेदनाद्वारे केली आहे.
सातव्या दिवशी कार्य केले म्हणून कुटुंबावर बहिष्कार
By admin | Published: December 24, 2015 11:37 PM