इचलकरंजी : सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रेमाच्या जाळ्यात ओढून मध्यप्रदेशमधील युवतीला कर्नाटकातील प्रियकराने इचलकरंजीच्या बसस्थानकात सोडून पलायन केले. निर्भया पथकाने युवतीला ताब्यात घेऊन चौकशी केल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. पोलिसांनी युवतीच्या नातेवाइकांशी संपर्क साधला असून, प्रियकराचाही शोध घेत आहेत.याबाबत पोलिसांतून मिळालेली माहिती अशी, मध्यप्रदेशातील खंडवा जिल्ह्यात राहणाऱ्या युवतीचा सोशल मीडियावरील वफा या अॅपच्या माध्यमातून कर्नाटकातील एका तरुणाशी ओळख झाली. महिन्याभराच्या चॅटींगने ओळखीचे प्रेमात रुपांतर झाले. त्यामुळे प्रियकराने तिला शिमोगा-बेंगलोर येथे आपल्या घरी बोलावून घेतले. परंतु नातेवाइकांनी नकार दिल्याने दोन दिवसांनी प्रियकराने तिला बसमधून इचलकरंजीत आणले. येथील मध्यवर्ती बसस्थानकात तिला सोडून प्रियकर निघून गेला.तासभर वाट पाहून प्रियकर परत न आल्याने युवती रडू लागली. ही माहिती निर्भया पथकाला मिळाल्यानंतर पथकाने तिला विश्वासात घेऊन माहिती घेतली. त्यातील तिची फसवणूक झाल्याचे लक्षात आले. पोलिसांनी पालकांना बोलावले असून, तिला त्यांच्या ताब्यात देण्यात येणार आहे. ही कारवाई निर्भया पथकाच्या प्रमुख उर्मिला खोत, स्वाती जाधव, लक्ष्मण मुठे, आदींच्या पथकाने केली.
कोल्हापूर: प्रियेसीला बसस्थानकात सोडून प्रियकराचे पलायन, सोशल मीडियावरून झाले होते प्रेम
By ऑनलाइन लोकमत | Published: October 29, 2022 6:08 PM