जयसिंगपूर : सध्याच्या युवकांनी शिवाजी महाराजांचे विचार आत्मसात केल्यास जीवनात ते कधीही मागे राहणार नाही. विविध कार्यक्रमांत प्रबोधनपर कार्यक्रम ठेवल्यास छत्रपती शिवाजी महाराज व राजर्षी शाहू महाराज यांचे विचार जपले जातील. समाजात विश्वशांतता जपण्यासाठी ब्रह्माकुमारी यांचे प्रयत्न सुरू आहेत. ब्रह्माकुमारींच्या पुढाकाराने करण्यात आलेल्या विश्वविक्रमी पुस्तकातून जयसिंगपूरचे नाव अग्र्रेसर राहणार असल्याचे खासदार संभाजीराजे यांनी सांगितले.जयसिंगपूर येथे ब्रह्माकुमारी विश्वविद्यालय सेवा केंद्राच्या वतीने जयसिंगपूर शहर शताब्दी व द्विदशक महोत्सवाच्या निमित्ताने बुधवारी जगातील सर्वांत मोठे विश्वविक्रमी पुस्तकाचे उद्घाटन खासदार श्रीमंत युवराज छत्रपती संभाजीराजे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ते म्हणाले, जगात शांतता राहण्यासाठी ब्रह्माकुमारी विश्वविद्यालय यांचे प्रयत्न उल्लेखनीय आहेत. त्याच्यामुळे येत्या पिढीला आदर्श घडणार आहे. यावेळी आमदार उल्हास पाटील म्हणाले, शहराच्या शताब्दी वर्षात विश्वविक्रमी पुस्तकाचे प्रकाशन करून एक आदर्श दिला आहे. या पुस्तकातून ब्रह्माकुमारींच्या विचारांचे अध्ययन केल्यास मनाला शांती मिळणार असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी नगराध्यक्ष डॉ. नीता माने, उपनगराध्यक्ष संजय पाटील-यड्रावकर यांच्यासह मान्यवरांनी मनोगते व्यक्त केली. प्रारंभी स्वागत राणी बहेनजी, तर प्रास्ताविक उत्तम भाई यांनी केले. दरम्यान पुस्तकाचे आॅनलाईन पद्धतीने मान्यवरांच्या हस्ते लाँचिंग करण्यात आले. यावेळी गुरुदत्त शुगर्सचे अध्यक्ष माधवराव घाटगे, बजरंग खामकर, आण्णासाहेब चकोते, डॉ. स्वर्णश्री गुर्रम, विनोद चोरडिया, डॉ. दीपक हारके, गंगाधर भाई, सुनीता बहेनजी, नगरसेविका प्रेमला मुरगुंडे, पराग पाटील उपस्थित होते. गिनीज बुकात नोंदब्रम्हाकुमारी विश्वविद्यालय सेवा केंद्राच्या वतीने द्विदशक शतक महोत्सव व शताब्दी वर्षानिमित्त जयसिंगपूर शहराची माहिती व ब्रह्माकुमारी विश्वविद्यालयाची माहिती असणारे २० फूट उंची व रुंदी ३० फूट आकाराचे पुस्तक तयार करण्यात आले आहे. याची नोंद गिनीज बुकात झाली आहे.
विश्वशांततेसाठी ब्रह्माकुमारीचा पुढाकार
By admin | Published: February 23, 2017 1:00 AM