लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : येथील छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयामध्ये (सीपीआर) पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी स्वत: सुमारे दीड लाख रुपये किमतीचे क्रॉनियो टॉमी यंत्र (कवटी उघडण्याचे मशीन) सोमवारी दिले. त्यामुळे येथून पुढे मेंदूवरील सर्व शस्त्रक्रिया ट्रामा केअर सेंटरमध्ये होणार असून, रुग्णांना एकप्रकारे जीवनदान मिळणार आहे. दोन महिन्यांपूर्वी सीपीआरमध्ये न्युरॉलॉजिस्ट (मेंदू तज्ज्ञ) दाखल झाले आहेत.अवयवदानाबाबत समाजात अजूनही लोकांना अवयवदान पचनी पडलेले नाही. त्यामुळे त्याचे प्रबोधन वाढविणे आवश्यक असल्याचे मत पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी महाअवयवदान पंधरवडा व नेत्रदान सांगता समारंभावेळी व्यक्त केले. यावेळी जिल्हा परिषदेचे अध्यक्षा शौमिका महाडिक, आरोग्य सभापती सर्जेराव पाटील-पेरिडकर, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कुणाल खेमणार, आरोग्य अधिकारी डॉ. प्रकाश पाटील, राजर्षी शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रभारी अधिष्ठाता डॉ. झिंगाडे, वैद्यकीय अधीक्षक डॉ. शिशिर मिरगुंडे प्रमुख उपस्थित होती. आॅडिटोरियमच्या सभागृहात सांगता समारंभ झाला. सकाळी ट्रामा केअर सेंटरमध्ये ‘क्रॉनियोटॉमी यंत्र’चे उद्घाटन पालकमंत्री पाटील यांच्या हस्ते झाले. यावेळी ते म्हणाले, ‘सीपीआरसाठी खूप नवीन गोष्टी मनापासून केल्या आणि याही पुढे करणार आहे. सीपीआर हे मध्यवर्ती ठिकाण असल्याने गोवा, कर्नाटक या सीमाभागांसह विशेषत: रत्नागिरी, सिंधुदुर्ग व सांगली, सातारा या जिल्ह्यांतून रुग्ण उपचारासाठी येतात. त्यामुळे रुग्णसेवेसाठी मागेल ती मदत देऊच.यावेळी शौमिका महाडिक यांनीही मनोगत व्यक्त केले. जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एल. एस. पाटील यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. वैद्यकीय अधीक्षक डॉ. शिशिर मिरगुंडे यांनी आभार मानले. या समारंभात नेत्रदान केलेल्या व्यक्तींच्या कुटुबियांना प्रशिस्तीपत्र देवून सन्मानित करण्यात आले. नेत्रदाना पंधरवड्या निमित्त आयोजित केलेल्या रोगांळी, भिंत्तीपत्रक व घोषवाक्य स्पधेर्तील विजेत्यांचा सत्कार करण्यात आला. समारंभास डॉ. अतुल जोगळेकर, नेत्र विभागाचे प्रमुख डॉ. ढवळे, डॉ. संजय रसाळ, डॉ. सरुडकर, डॉ. सदानंद पाटील, आदी मान्यवर उपस्थित होते.दीड लाखाचे मशीन चार दिवसांत उपलब्ध..सीपीआर रुग्णालयात पूर्णवेळ न्यूरोसर्जन नव्हता. त्यामुळे येथे मेंदूवरील शस्त्रक्रियाच होत नव्हत्या. मध्यंतरी काही काळ डॉ. नंदकुमार जोशी हे मानसेवी म्हणून सेवा देत होते; परंतु त्यांच्यानंतर तज्ज्ञ नसल्याने या शस्त्रक्रिया करताच येत नव्हत्या. काही महिन्यांपूर्वी डॉ. अनिल जाधव हे न्यूरोसर्जन म्हणून रुजू झाले आहेत. त्यांनी गेल्या दोन महिन्यांत मणक्यांवरील ८ शस्त्रक्रिया केल्या; परंतु मेंदूवरील शस्त्रक्रिया करता येत नव्हतीत्न कारण क्रॉनियो टॉमी हे मशीन उपलब्ध नव्हते. हे मशीन असल्याशिवाय रुग्णाची कवटीच उघडता येत नाही. गेल्या आठवड्यात पालकमंत्री पाटील यांना ही अडचण सीपीआरच्या व्यवस्थापनाने सांगितली. त्यांनी तातडीने दीड लाख रुपये उपलब्ध करून दिले व त्यातून अवघ्या चार दिवसांत हे मशीन सीपीआरमध्ये बसविण्यात आले. त्यामुळे मेंदूवरील शस्त्रक्रिया करण्याचा मार्ग मोकळा झाला.यांना करणार मदत...समाजातील गरीब मुलींचे डोळे तिरळेपण, दातांचा वेडेवाकडेपणा असतो. पैशांअभावी त्यांच्यावर शस्त्रक्रिया होत नाही. याचा परिणाम त्यांचा विवाह ठरत नाही. अशा गरजूंसाठी मी शंभर टक्के मदत करणार आहे. या क्षेत्रातील विशेष तज्ज्ञ यांच्याशी माझे बोलणे झाले आहे, असे चंद्रकांतदादा पाटील यांनी यावेळी सांगितले.सातवा वेतन आयोग..सातवा वेतन आयोग लागू झाल्यानंतर सरकारी कर्मचाºयांना भरमसाट पैसे मिळणार आहेत. त्यामुळे त्यांनी सेवावृत्ती जोपासावी. पगारातील पैसा गरजू रुग्णांसाठी खर्च करण्याचा प्रयत्न करावा, असेही आवाहन पालकमंत्र्यांनी केले.
सीपीआरमध्ये होणार आता मेंदूवरील शस्त्रक्रिया
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 12, 2017 1:04 AM