कोल्हापूर : कोरोनानंतर जगभरातून गुळाच्या मागणीत वाढ झाली असून, निर्यातही तीन पटीने वाढली आहे. शेतकऱ्यांनी पारंपरिक गूळ उत्पादनापासून थोडे बाजूला होऊन बाजारपेठेची गरज ओळखून गुणवत्तापूर्ण उत्पादन घेतले, तर गूळ व्यवसायाला सोन्याचे दिवस येण्यास वेळ लागणार नाही, असा विश्वास व्यक्त करत बाजार समितीने ‘कोल्हापुरी गुळा’साठी ब्रॅंड ॲम्बेसिडर नेमून मार्केटिंग केले, तर खाणारे लोक वाढतील आणि दर चांगला मिळेल, असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्य कृषी पणन पुणे विभागीय कार्यालयाचे उपसरव्यस्थापक डॉ. सुभाष घुले यांनी केले.कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समितीच्या वतीने बुधवारी आयोजित केलेल्या गूळ उत्पादकांच्या कार्यशाळेत ते बोलत होते. जिल्हा उपनिबंधक निलकंठ करे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. अध्यक्षस्थानी समितीचे सभापती ॲड. प्रकाश देसाई होते. डॉ. घुले म्हणाले, गेल्या सहा वर्षांत देशात ३४०० कोटींपर्यंत गुळाची निर्यात पाेहचली आहे. ‘कोल्हापुरी गुळा’ची चव वेगळी असल्याने निर्यातीसाठी खूप वाव आहे. ब्रॅंडिंगसह पॅकेजसाठी शासनाचे अनुदान असून, त्याचा फायदा शेतकऱ्यांनी एकत्रीतपणे घेतला आहे.समितीचे संचालक सूर्यकांत पाटील, प्रा. डॉ. ए. एम. गुरव, डॉ. शर्वरी माने, ऊस व गूळ संशोधन केंद्राचे डॉ. बी. जी. गायकवाड, जिल्हा उद्योग केंद्राचे रवी साखरे यांनी मनोगत व्यक्त केले. उपसभापती सोनाली पाटील, सचिव जयवंत पाटील, संचालक उपस्थित होते.
गूळ नको संकल्पना विकाशेतकऱ्यांनी नुसते गूळ विकायचे ठरवले, तर फारसे हातात पडणार नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी बाजारात गूळ विकू नका, तर संकल्पना विकायला शिकले पाहिजे, असे आवाहन प्रा. डॉ. गुरव यांनी केले.
दिपावलीपूर्वी गूळ महोत्सवकोल्हापुरी गुळाला चालना देण्यासाठी दिपावली पूर्वी कोल्हापूरसह सांगली, पुणे व मुंबई येथे गूळ महोत्सव घेत असतानाच दोन महिन्यांत ‘खरेदी-उत्पादक’ मेळाव्याचे आयोजन केले जाणार आहे. यामध्ये मुंबईतील निर्यातदार येऊन थेट शेतकऱ्यांशी संवाद साधणार असल्याचे डॉ. सुभाष घुले यांनी सांगितले.