कोल्हापूर : जिल्ह्यातील सर्व साखर कारखान्यांनी ७०:३० या फॉर्म्युल्यानुसार पूरबाधित क्षेत्रातील उसाची तोडणी १५ जानेवारीपर्यंत संपवावी, असे आदेश जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी सोमवारी येथे दिले.जिल्हाधिकारी कार्यालयात पूरबाधित क्षेत्रातील शेतीपंपांच्या वीज जोडणीचा आढावा घेण्यासाठी आयोजित बैठकीत ते अध्यक्षस्थानावरून बोलत होते. यावेळी प्रा. एन. डी. पाटील, वीजतज्ज्ञ प्रताप होगाडे, माजी आमदार उल्हास पाटील, बाबासाहेब पाटील-भुयेकर, विक्रांत पाटील-किणीकर, मारुती पाटील, महावितरणचे अधीक्षक अभियंता अंकुर कावळे, कार्यकारी अभियंता सागर मारुलकर, तहसीलदार अर्चना कापसे, साखर उपसंचालक एन. एस. जाधव, आदींची प्रमुख उपस्थिती होती.
जिल्ह्यात आॅगस्ट महिन्यात आलेल्या महापुराने नुकसान झालेल्या कृषी पंपांचे पंचनामे करण्याबाबत सूचना केल्या होत्या. तसेच महापुरामुळे रोहित्रे, विद्युत खांब, वायर मीटर्स यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. सर्व कृषी पंपांचे कनेक्शन वेळेत सुरू करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी वेळोवेळी आढावा बैठक घेऊन कृषी पंपांचे वीज कनेक्शन ताबडतोब जोडणीसाठी निर्देश दिल्याने बहुतांश कृषी पंपांची वीज कनेक्शन जोडली असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
अद्याप काही कृषी पंपांचे वीज कनेक्शन जोडणी असल्यास ती तत्काळ जोडावीत, तसेच महापुराने बाधित कृषी पंपांचे केलेले पंचनामे याची सविस्तर माहिती तीन दिवसांत द्यावी, असे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी अधिकाºयांना दिले. त्याचबरोबर सर्व साखर कारखान्यांनी पूरबाधित क्षेत्रातील ऊस तोडणी १५ जानेवारीपर्यंत पूर्ण करावी, असे आदेश जिल्हाधिकाºयांनी साखर उपसंचालक एन. एस. जाधव व सर्व कारखान्यांच्या कार्यकारी संचालकांना दिले. यावेळी सुभाष शहापुरे, आर. के. पाटील, संजय चौगुले, सखाराम चव्हाण, महादेव सुतार, आदी उपस्थित होते.
तालुकावार वैयक्तिक कृषी पंपधारक शेतकरी व सहकारी पाणीपुरवठा संस्था यांची संख्या व झालेल्या नुकसानीची रकमेसह माहिती द्यावी.- दौलत देसाई, जिल्हाधिकारी
पूरबाधित उसाकडे कारखानदारांची पाठकोल्हापूर : पूरबाधित उसाचे नुकसान लक्षात घेऊन जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी प्राधान्याने या उसाची उचल करण्याचे आदेश देऊनही त्याकडे साखर कारखान्यांनी पाठ फिरविली आहे. गेल्या महिनाभरात केवळ ४३०७ हेक्टरवरील उसाची उचल कारखान्यांनी केली आहे. अद्याप २३ हजार हेक्टरवरील ऊस शिवारातच पडून असल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. ‘पंचगंगा’, ‘जवाहर’, ‘घोरपडे’ कारखाने असा ऊस उचलण्यात सगळ्यात मागे राहिले आहेत.
जुलै-आॅगस्ट महिन्यांत आलेल्या महापुरात ऊस पिकांचे मोठे नुकसान केले. जिल्ह्यात एक लाख ९७ हजार ९४६ हेक्टरवर उसाचे क्षेत्र असून, त्यातील २७ हजार ६६१ हेक्टर पूरबाधित क्षेत्र आहे. पूरबाधित उसाची लवकर तोड न झाल्यास शेतकऱ्यांच्या हाताला काहीच लागणार नाही; त्यामुळे या उसाची प्राधान्याने उचल करावी, अशी मागणी शेतकरी संघटनांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली होती. त्यानंतर जिल्हाधिकारी देसाई यांनी साखर कारखानदार, शेतकरी संघटनांच्या प्रतिनिधींची बैठक घेऊन तीन आठवड्यांत टप्प्याटप्प्याने उसाची उचल करण्याचे आदेश दिले होते.
कारखान्यांनीही प्राधान्याने या उसाची उचल करण्याची ग्वाही दिली होती. हंगाम सुरू होऊन महिना उलटला तरी केवळ ४३०७ हेक्टरवरील पूरबाधित उसाची उचल केली आहे. अद्याप २३ हजार ४२९ हेक्टरवरील ऊस शिवारात उभा आहे; त्यामुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत. याबाबत जिल्हाधिकारी देसाई यांनी सोमवारी आढावा बैठक घेऊन कारखानदारांना स्पष्ट शब्दांत सूचना दिल्या आहेत. सर्वाधिक पूरबाधित क्षेत्र दत्त-शिरोळ कारखान्याचे २५०० हेक्टर आहे, त्यांनी आतापर्यंत ५६० हेक्टरवरील उसाची उचल केली आहे. ‘जवाहर’, ‘पंचगंगा’, ‘घोरपडे’ कारखाने पूरबाधित ऊस उचलीत फारच मागे आहेत. यंदा हंगाम जेमतेम तीन महिने चालेल, अशी परिस्थिती आहे. एकंदरीत साखर कारखानदारांची मानसिकता पाहता हंगाम संपेपर्यंत टप्प्याटप्प्याने पूरबाधित उसाची उचल करण्याचे नियोजन दिसत आहे.
उतारा घटण्याची धास्तीपूरबाधित ऊस एकदम तोडल्यास साखर उताऱ्यावर परिणाम होणार आहे. सध्या सर्वच कारखान्यांचा उतारा तुलनेत कमी आहे. या धास्तीमुळेच पूरबाधित उसाकडे दुर्लक्ष केले जात आहे.