कोल्हापूर : मनमानी कारभारामुळे शिक्षक बँकेच्या अस्तित्वासमोर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. बँकेतील एकाधिकारशाही मोडून काढत शिक्षकांचे मातृसंस्थेचे अस्तित्व अबाधित ठेवण्यासाठी सभासदांनी सज्ज व्हावे, असे आवाहन महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाचे संपर्कप्रमुख एस. व्ही. पाटील यांनी केले. जिल्ह्यात शिक्षक नेते संभाजीराव थोरात यांच्या नेतृत्वाखाली शिक्षक संघाची अभेद्य फळी उभारणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
गडहिंग्लज तालुक्यातील शिक्षकांच्या मेळाव्यात ते बोलत होते. पाटील म्हणाले, संघाचे दिवंगत नेते पी. सी. पाटील यांनी सहकारात काम करण्यासाठी दिलेल्या मूलमंत्रानुसार बँकेत काम करू. संभाजीराव थोरात यांनी प्रलंबित प्रश्न मार्गी लावल्याने शिक्षक तणावमुक्त काम करीत आहेत.
संघाचे जिल्हाध्यक्ष रवीकुमार पाटील म्हणाले, शिक्षक बॅँक ही आपली मालमत्ता असल्यासारखे सत्ताधारी वागत आहेत. नोकरभरतीस सर्वसाधारण सभेत सभासदांनी विरोध करून अनादर करीत भरती केली. अशा प्रवृत्तीला धडा शिकविण्यासाठी सभासदांनी पाठीशी रहावे. रघुनाथ खोत, सुनील पाटील, सुरेश कांबळे, लक्ष्मी पाटील, दुंडेश खामकर, पुष्पाताई वाघराळकर यांनी मनोगत व्यक्त केले. विनायक पवार, अनिल बागडी, विठ्ठल कदम, संदीप कदम, बाळासाहेब वालीकर, आनंदा पाटील, नंदकुमार वाईंगडे, मधुकर येसणे आदी उपस्थित होते.
फोटो ओळी : गडहिंग्लज येथे प्राथमिक शिक्षक संघाच्या मेळाव्यात एस. व्ही. पाटील यांनी मार्गदर्शन केले. यावेळी संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते. (फोटो-१४०२२०२१-कोल-गडहिंग्लज)