घन:शाम कुंभार - यड्राव -शिरोळकडून इचलकरंजीकडे मोठ्या प्रमाणात वाळू वाहतूक सुरू आहे. मर्यादेबाहेर भरलेल्या वाळूमुळे रस्ता खचत आहे, तर परत मोकळ्या होऊन भरधाव येणाऱ्या ट्रकमुळे अपघाताचे प्रसंग उद्भवत आहेत. वाळू वाहतुकीमुळे सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान होत असून, मार्गावरील ग्रामस्थांचा जीव धोक्यात आहे. याकरिता वाळू वाहतुकीच्या ट्रकना वेगमर्यादेची गरज आहे. अन्यथा या मार्गावरील ग्रामस्थ वाळू वाहतूक विरोधाच्या पवित्र्यात आहेत.शिरोळकडून नांदणीमार्गे इचलकरंजी व परिसरात मोठ्या प्रमाणात वाळू वाहतूक होत आहे. पहाटेपासून सकाळी दहापर्यंत तर एकापाठोपाठ वाळू वाहतूक करणारे ट्रक या मार्गावर असतात. सर्वच ट्रकमध्ये मर्यादेपेक्षा जास्त वाळू भरणा केला असल्याने अशा वाहनांचा वेग कमी असतो; परंतु ही वाहने रस्त्याच्या मध्यावरून जात असल्याने इतर वाहनांना जाण्यास मार्ग मिळत नाही. तसेच ओव्हरलोड वाळूच्या वजनाने डांबरी रस्ता दोन्ही बाजूने खचत आहे.वाळू ट्रकमधून उतरल्यानंतर पुन्हा वाळू भरण्यासाठी आवटीवर जाण्याकरिता ट्रकचालकांची वेग स्पर्धा सुरू होते. रस्ता अरुंद, दोन्ही वाहने वेगात एकमेकांच्या पुढे जाण्याची ईर्षा, यामुळे इतर वाहनांना ही स्पर्धा जीवघेणी ठरत आहे. यामुळे इतर वाहनधारक व ट्रकचालकांमध्ये वादावादीचे प्रसंग वारंवार उद्भवत आहेत. दोन दिवसांपूर्वी एका मोकळ्या ट्रकचालकाने यड्राव येथील रेणुकानगरजवळ दुचाकीस्वारास घासून ट्रक घेतल्याने तो पडला अन् जखमी झाला. परंतु ट्रकचालक तसाच पुढे निघून गेला. हरोली-नांदणी या गावादरम्यान दुपारच्या वेळेस दोन ट्रकमध्ये वेग स्पर्धा सुरू होती. यावेळी समोरून दुचाकीस्वाराने प्रसंगावधान राखल्याने अपघात टळला. मात्र, त्याने त्या दोन्ही ट्रकचा पाठलाग करून, त्यांना अडवून जाब विचारला. यावेळी वादावादी झाली व जमलेल्या ग्रामस्थांनी ट्रकचालकावर हातसफाई करून घेतली. ट्रकचालक हे व्यसनी, अज्ञानी व अप्रशिक्षित असतात. ट्रकमालकांना ते कमी पगारात मिळतात म्हणून त्यांना वाहनाबरोबर पाठविण्यात येते. अशा चुकीच्या धोरणामुळे एखादा जीवघेणा अपघात झाला, तर त्या कुटुंबावर येणारे संकट किती भयानक असेल, याची गांभीर्यता असणे गरजेचे आहे. यासाठी ट्रकमालकांनी ट्रकचालक प्रशिक्षित, निर्व्यसनी ठेवणे गरजेचे आहे. त्याला वाहतुकीच्या नियमांची पूर्ण माहिती असणे गरजेचे आहे.ट्रकमध्ये मर्यादेबाहेर वाळू भरल्यामुळे डांबरी रस्ता दोन्हीकडून खचून सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान होत आहे. याकरिता मर्यादेपेक्षा जास्त वाळू वाहतूक होऊ नये, याकडे रस्ते वाहतूक विभागाने लक्ष देण्याची आवश्यकता आहे. अन्यथा एखाद्या चालकाची चूक सर्व वाळू वाहतूकदारांना नुकसानीची ठरू शकते.
वाळू वाहतूक करणाऱ्या ट्रकना लावा मर्यादेचा ‘ब्रेक’
By admin | Published: June 06, 2015 12:01 AM