लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : कोरोना संसर्गाचा दुसऱ्या लाटेनंतर काही अंशी स्थिरावू पाहणाऱ्या एसटी महामंडळाच्या कोल्हापूर विभागास जिल्ह्यातील पूरस्थितीमुळे पुन्हा ब्रेक लागला. विभागातून ३५० अधिक बसेस रोज विविध मार्गावर धावतात. मात्र शुक्रवारी केवळ २० बसेसच धावल्या. त्यामुळे उत्पन्न घटले.
एसटीची कोल्हापूर विभागातील १२ आगारातून रोज ३५० हून अधिक बसेस मुंबई, पुणे, नाशिक, लातूर, उस्मानाबाद, नांदेड, सोलापूर, सांगली, सातारा व जिल्हा अंतर्गत धावतात. त्यातून या विभागास ३५ लाखांचे रोज उत्पन्न मिळते. इतके उत्पन्न कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनंतर मिळत होते. मात्र, या उत्पन्नाला काहीशी नजरच पुरामुळे लागली. गुरुवारी रात्रीपासून राज्यातील काही भागात पावसाने हाहाकार माजवला आहे. त्यामुळे कोल्हापुरातून त्या मार्गावरील बसेस बंद करण्यात आल्या. सुमारे ३३० बसेस पुन्हा आगारात उभा करण्यात आल्यामुळे काही प्रमाणात या विभागाची गाडी रुळावर येत होती. मात्र पुन्हा या गाडीला ब्रेक लागला.
दुपारपर्यंत पुणे, सांगली सातारा सुरू
जिल्ह्यातील बहुतांशी भागात पूर स्थितीमुळे मार्ग बंद झाले आहेत. यात गगनबावडा, आजरा, चंदगड, निपाणी, गारगोटी, आदी तालुक्यांचा समावेश आहे. पुणे, सांगली, साताराकडे जाणारी वाहतूक दुपारी १२ पर्यंत सुरू होती. महामार्गावर पाणी वाढल्यानंतर तीही वाहतूक बंद करण्यात आली.