कोल्हापूर : मावशी व मामाला मारहाण का केली? असा जाब विचारण्यासाठी गेलेल्या पिता-पुत्राला लोखंडी स्टॅंड व फरशीच्या तुकड्याने मारहाण केल्याची घटना शनिवारी दुपारी रविवार पेठेत घडली. मारहाणीत गोपी प्रल्हाद कदम (वय ४७) व त्याचा मुलगा त्रिगुण ऊर्फ सोनू कदम (दोघेही रा. नाथा गोळे तालीम शेजारी, शिवाजी पेठ) हे दोघे जखमी झाले. पोलिसांनी चौघांवर गुन्हा दाखल केला आहे.
गुन्हा दाखल झालेल्या संशयितांची नावे अशी : रोहित देसाई, गौरव देसाई, उमेश देसाई, राजू देसाई (चौघे रा. दिलबहार तालीमनजीक, रविवार पेठ).
पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, दिलबहार तालीमनजीक सूरज इलेक्टॉनिक्सचे दुकान आहे. संशयितांनी किरकोळ कारणावरून या दुकानात घुसून आतील पार्टिशन, दरवाजाचे प्लायवूड, ग्राहकांचा टीव्ही, ऑडिओ प्लेअर, आदी साहित्यांची मोडतोड केली. हल्ल्यात दुकानाचे सुमारे २५ हजारांचे नुकसान झाले. तसेच दोघांना मारहाण केली. याबाबत मावशी व मामाला मारहाण का केली व साहित्यांची मोडतोड का केली? असा जाब विचारण्यासाठी गोपी कदम व त्रिगुण कदम हे दोघे पिता-पुत्र गेले. त्यावेळी संशयित चौघांनी त्या दोघांना बेदम मारहाण केली. तसेच गौरी उभा करण्याचे लोखंडी स्टॅंड मारल्याने गोपी कदम हे गंभीर जखमी झाले. त्यांना उपचारासाठी सीपीआर रुग्णालयात दाखल केले. याबाबत चौघा संशयितांवर गुन्हा नोंद केला आहे.