कोल्हापूर : इचलकरंजी येथील बावणे गल्लीतील देशी दारूचे दुकान बंद करण्यासाठी आंतरराष्ट्रीय मानवाधिकार न्याय संघटनेच्या कार्यकर्त्यांनी बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयात दारूच्या बाटल्या फोडून, तसेच शेण ओतून आक्रमक आंदोलन केले. अचानक घडलेल्या या आंदोलनामुळे खळबळ उडाली. तब्बल दोन तास भर उन्हात आंदोलकांनी ठिय्या मारला. जिल्हाधिकाऱ्यांसमवेत आज, गुरुवारी दुपारी १२ वाजता बैठक घेण्याचे आश्वासन प्रशासनाने दिले. त्यानंतर सर्व आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेऊन शाहूपुरी पोलिस ठाण्यात नेले. इचलकरंजी येथील बावणे गल्लीतील वॉर्ड नं. १२ मध्ये असणारे दारूचे दुकान २४ तासांत बंद करावे किंवा जिल्हाधिकाऱ्यांच्या अधिकारात दोन वर्षांच्यावर अनिश्चित काळासाठी बंद करावे, या मागणीसाठी सोमवारी आंतरराष्ट्रीय मानवाधिकार संघटनेच्या कार्यकर्त्यांनी निवासी उपजिल्हाधिकारी शंकर बर्गे यांची भेट घेऊन आम्हाला जिल्हाधिकाऱ्यांना भेटायचे असून, हा प्रश्न आजच्या आज निकालात निघाला पाहिजे, असे सांगितले. यावेळी, दालनात दुसऱ्या एका आंदोलकांबरोबर चर्चा सुरू असल्याने थोडा वेळ थांबा. यानंतर आपण बोलू, असे आंदोलकांना सांगितले. परंतु, आक्रमक झालेल्या आंदोलकांनी तेथून बाहेर येऊन निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांच्या दालनाशेजारी दारूच्या बाटल्या फोडून व सोबत आणलेल्या शेणाच्या पिशव्या ओतून निषेध केला. अचानक घडलेल्या या प्रकाराने खळबळ उडाली. फुटणाऱ्या दारूच्या बाटल्यांच्या आवाजाने उपस्थित कर्मचाऱ्यांमध्ये घबराटीचे वातावरण निर्माण झाले. या प्रकाराची माहिती कळताच काही वेळातच पोलिस उपअधीक्षक भारतकुमार राणे, पोलिस निरीक्षक प्रवीण चौगुले यांच्यासह पोलिसांचा फौजफाटा या ठिकाणी दाखल झाला. तोपर्यंत आंदोलकांनी भर उन्हातच फुटलेल्या बाटल्यांशेजारीच ठिय्या मारला. जिल्हाधिकाऱ्यांशी भेट झाल्यानंतरच येथून उठणार, असा पवित्रा त्यांनी घेतला. संघटनेचे अध्यक्ष उदय घाडगे यांनी फुटलेली बाटली हातात घेऊन, जर आम्हाला जिल्हाधिकाऱ्यांच्या भेटीपूर्वी ताब्यात घेतले तर हाताची शीर कापून घेण्याची धमकी पोलिसांना दिली. त्यामुळे पोलिसांचीही आंदोलकांना ताब्यात घेताना अडचण झाली. तोपर्यंत जिल्हाधिकाऱ्यांशी प्रशासनातील कर्मचाऱ्यांकडून संपर्क साधला जात होता. परंतु, ते गगनबावड्याला गेल्याने त्यांच्याशी संपर्क होत नव्हता. तोपर्यंत निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांनी कोल्हापूरचे राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक राजेंद्र कावळे यांना बोलावून घेऊन त्यांच्याशी चर्चा केली. जिल्हाधिकाऱ्यांशी संपर्क झाल्यानंतर आज, गुरुवारी जिल्हाधिकाऱ्यांसमवेत आंदोलकांची बैठक घेण्याचे आश्वासन मिळाल्यानंतर दुपारी पावणेतीनच्या सुमारास हे आंदोलन मागे घेण्यात आले. यानंतर पोलिसांनी त्यांना ताब्यात घेऊन पोलिस ठाण्यात नेले.
दारूच्या बाटल्या फोडून निषेध
By admin | Published: June 02, 2016 1:27 AM