इचलकरंजी : दहावीच्या परीक्षेत ऑनलाईनच्या माध्यमातून गुण वाढविण्यासाठी दिलेले पैसे परत मागितल्याच्या कारणावरून एकाच्या घरात घुसून मारहाण केली. याप्रकरणी चौघांवर शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. ही घटना २४ नोव्हेंबर २०२० ला घडली.
प्रेम बाळासाहेब पाटील, ओमकार दत्ता डाकरे (दोघे रा. स्वामी मळा), सुमित नेमिनाथ देशमाने व अनिकेत जिवंधर केटकाळे (दोघे रा. सनी कॉर्नर) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याबाबत पोलिसांतून मिळालेली माहिती अशी, कबनूर (ता. हातकणंगले) येथील एका विद्यार्थ्याला दहावीच्या परीक्षेत कॉपी पुरवून ऑनलाईन गुण वाढवतो, असे सांगून प्रेम पाटील याने मे २००२ मध्ये २२ हजार ५०० रुपये घेतले होते. परंतु परीक्षेत गुण न वाढल्याने दिलेले पैसे तो विद्यार्थी परत मागण्यासाठी गेला. त्यावेळी प्रेम याने ५ ऑगस्टला देतो, असे सांगितले.
पैसे मागण्यासाठी गेलेल्या विद्यार्थ्याला वरील चौघांनी मारहाण करत दमदाटी केली. याविरोधात चौघांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला होता. दरम्यान, २४ नोव्हेंबरला वरील चौघांनी विद्यार्थ्याच्या घरात घुसून लाथाबुक्क्यांनी मारहाण करत पोलिसांत दिलेली तक्रार मागे घे; अन्यथा तुला सोडणार नाही, अशी धमकी देत सुमित व अनिकेत यांंनी त्या विद्यार्थ्यास मारहाण केल्याचे तक्रारीत म्हटले आहे.