कोल्हापूर : तुमची सर्वांची इच्छा असेल तर मी जबाबदारी स्वीकारायला तयार आहे, असे सांगत शाहू छत्रपती यांनी मंगळवारी आपल्या लोकसभा उमेदवारीबाबत स्पष्टपणे संकेत दिले. येथे ते एका पुस्तक प्रकाशन समारंभात बोलत होते. त्यांच्या या वक्तव्याने ते लोकसभेच्या निवडणूक रिंगणात उतरणार असल्याचे मानले जात असून, त्यामुळे ही कोल्हापूरची जागा कॉंग्रेसलाच मिळण्याची शक्यताही बळावली आहे.मुंबईतही मंगळवारी दुपारी महाविकास आघाडीच्या बैठकीत याबाबत चर्चा झाल्याचे समजते. परंतु यामध्ये पक्ष आणि उमेदवार याबाबत अंतिम निर्णय झाला नसून आज बुधवारी पुन्हा आघाडीची बैठक होणार असल्याचे सांगण्यात आले.पत्रकार विजय पाटील यांच्या ‘ब्रेकिंग न्यूज’ या पुस्तकाच्या प्रकाशन समारंभात पुस्तकाच्या नावाचा संदर्भ देत शाहू छत्रपती म्हणाले, तुम्ही ज्या ब्रेकिंग न्यूजची वाट पहात आहात ती फक्त ब्रेकिंग न्यूज नसेल. तर ती मोठी जबाबदारी आहे. तुमच्या सर्वांची इच्छा असेल तर मी कामासाठी नेहमी उपलब्ध आहे. ही ब्रेकिंग न्यूज ऐशआराम करण्यासाठी नसून सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवण्यासाठीची असेल. आता ही प्रश्न सोडवले जात आहेत.परंतु ते अधिक गतीने आणि व्यापक पद्धतीने सोडवण्यासाठी तुम्हा सर्वांचे मार्गदर्शन लागणार आहे. तुम्ही म्हणता तशी बातमी आलीच तर आपल्या आणखी एक, दोन बैठकाही होतील. मी तुमच्याशी संवाद साधेन. एकाचवेळी सर्व प्रश्न सुटणार नाहीत. परंतु त्यासाठीचा प्राधान्यक्रम आपल्याला ठरवावा लागेल.
महाविकास आघाडीची आजही मुंबईत बैठकमुंबईत मंगळवारी दुपारी एका हॉटेलवर महाविकास आघाडीच्या नेत्यांची बैठक झाली. नाना पटोले, बाळासाहेब थोरात, पृथ्वीराज चव्हाण, जयंत पाटील, विनायक राऊत, संजय राऊत आदी नेते उपस्थित होते. पुन्हा या सर्वांची बुधवारी बैठक होणार असल्याचे सांगण्यात आले. दरम्यान, कोल्हापुरातून उमेदवारी मिळावी यासाठी ‘गोकुळ’चे संचालक चेतन नरके नेत्यांच्या भेटीगाठी घेत आहेत.