महानगरपालिका आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांनी पूरग्रस्तांच्या बचावकार्यात खूप मोठी भूमिका बजावली. पावसाळ्यापूर्वीच त्यांनी नियोजन केले, त्याप्रमाणे त्यांनी काम केले; परंतु नियतीने मोठे आव्हान दिले तेव्हा न डगमगता हा अधिकारी धैर्याने संकटाला सामोरा गेला. उपलब्ध मनुष्यबळ व साधनांच्या सहाय्याने चार दिवसांत त्यांनी दहा हजार लोकांना सुरक्षितस्थळी पोहोचविले. सकाळी सहा वाजता बाहेर पडणारा हा अधिकारी रात्री उशिरा घरी परतायचा. त्यानंतर उद्याचे नियोजन करून पहाटे चार वाजल्यापासून सहकारी अधिकाऱ्यांना झोपेतून उठवत असे.
देहभान, तहानभूक, कुटुंब सारं काही विसरून जाऊन स्वत:चंच कुटुंब मानलेल्या पूरग्रस्तांना त्यांना आश्वासक आधार दिला. पूर ओसरल्यावरदेखील पाणीपुरवठा, स्वच्छतेच्या कामात त्यांनी झोकून दिले आहे. आपली सर्व शक्ती पणाला लावून शासनाकडून अधिकारी आणण्यातदेखील त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. पुराच्या काळात खºया अर्थाने ते देवदूत बनले.