कोल्हापूर : कोणत्याही महत्त्वाच्या गुन्ह्यात तपास करणारी महत्त्वाची यंत्रणा अशी ओळख असलेल्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे (एलसीबी) दोन कॉन्स्टेबल लाच घेताना रंगेहात पकडल्याने ही शाखा गुन्हे अन्वेषणसाठी वापरली जात होती की पैसे वसुलीसाठी, असा प्रश्न शुक्रवारी लोकांतून उपस्थित झाला. गेल्याच आठवड्यात लक्ष्मीपुरीच्या एका कर्मचाऱ्यास गुन्ह्यात मदत करतो म्हणून दहा हजाराची लाच घेताना पकडण्यात आले होते. गेल्या आठ वर्षात ६३ पोलिसांना लाच घेताना पकडण्यात आले असून लाचखोरीत पोलीस खात्याचा दुसरा क्रमांक आहे. सध्याची प्रकरणे पाहता पोलीस खाते महसूल विभागास मागे टाकेल असेच चित्र आहे.
जिल्हा स्तरावरील पोलिस दलात स्थानिक गुन्हे अन्वेषण (एलसीबी) व जिल्हा विशेष शाखा (एलआयबी) या दोन शाखांना वेगळेच महत्त्व असते. त्यातील गुन्हे अन्वेषण शाखा ही महत्त्वाच्या गुन्ह्यांमध्ये स्वतंत्र यंत्रणा वापरून तपास करते. विशेष शाखा ही जिल्ह्यांत कायदा व सुव्यवस्थेचे पालन किती चांगल्या पध्दतीने होत आहे यावर लक्ष ठेवून असते. राजकीय, सामाजिक पातळीवर कुठे काय गडबड सुरू आहे याचा शोध ही शाखा घेते. त्यामुळे कायदा व सुव्यवस्था राखण्यात या दोन्ही शाखा परस्परांवर अवलंबून असतात. या दोन्ही शाखा म्हणजे पोलीस अधीक्षकांचा उजवा व डावा हात समजला जातो. त्यावर पूर्ण नियंत्रण पोलीस अधीक्षक यांचेच असते.तिथे कुणाला सेवेत घ्यायचे याचेही अधिकार पोलीस अधीक्षकांनाच असतात. त्यामुळे या दोन्ही शाखांची कार्यालयेही पोलीस मुख्यालयात पहिल्याच मजल्यावर समोरासमोर आहेत. पोलिस अधीक्षकांनी जाता-येता सहज वाकून पाहिले तरी तिथे काय सुरु आहे याचा अंदाज यावा एवढ्या नजरेच्या टप्प्यात या शाखा आहेत. शहरात किंवा जिल्ह्यात कोणताही महत्त्वाचा गुन्हा घडला तर त्याचा तपास गुन्हे अन्वेषण शाखेकडे देण्याचे अधिकारही पोलीस अधीक्षक यांनाच असतात. पोलीस उपअधीक्षकांनाही हे अधिकार नाहीत. त्यांना पोलिस अधीक्षकांनाच विनंती करावी लागते. वरिष्ठ अधिकाऱ्यांचे एवढे थेट नियंत्रण असलेल्या शाखेचे दोन कर्मचारी तब्बल दहा लाखांची लाच घेताना सापडतात ही पोलीस दलाच्यादृष्टीने नामुष्कीजनक बाब आहे.
'एलसीबी' म्हणजे काहींना पैसे मिळवण्याचा परवाना
पोलिस अधीक्षक मुख्यालयात पोलीस दलाचीच विविध सुमारे पंधरा कार्यालये आहेत. तिथे दिवसभर लोकांचा राबता असतो. एलसीबीमध्ये एक पोलीस निरीक्षक, सहायक पोलिस निरीक्षक, फौजदार व कर्मचारी अशी किमान २५ जणांची टीम असते. अनेक महत्त्वाचे गुन्हे उघडकीस आणण्यात या शाखेने कौशल्य दाखवले आहे. परंतु काहीजण तिथे काम करण्याची संधी मिळाली म्हणजे पैसे मिळवण्याचा परवानाच मिळाला यापध्दतीने व्यवहार करत होते. त्यांनी यातून मिळवलेली संपत्ती, बांधलेली घरे, विकत घेतलेले भूखंड हे पाहून अन्य पोलीस कर्मचाऱ्यांचे डोळे पांढरे व्हायची वेळ आली होती. आता तिथे थेट कारवाईच झाल्याने तेथील लुटमारीवर शिक्कामोर्तब झाले.
लाचेसाठी सोकावलेल्यांना वेळ, काळचे नसते भान जे कर्मचारी सापडले त्यांच्यासह आणखी कांही कर्मचाऱ्यांच्या कार्यपध्दतीबध्दल गंभीर तक्रारी होत्या. त्यातील दोघे सापडले, इतरांचीही चौकशी होण्याची शक्यता आहे. सातत्याने पैसे घेण्यासाठी हात आसुसलेले की मग ठिकाण, वेळ, काळ याचे भान राहत नाही असेच या प्रकरणावरून दिसत आहे.