विटा : शिवाजी विद्यापीठ आंतरविभागीय खो-खो स्पर्धेत येथील बळवंत महाविद्यालयातील मुलींच्या संघाने अजिंक्यपद पटकाविले. त्यांनी अंतिम सामन्यात फलटणच्या मुधोजी महाविद्यालयाचा १ डाव ४ गुणांनी पराभव केला. बळवंत महाविद्यालयाच्या प्रांगणात स्पर्धेचे आयोजन करण्यात आलेल्या या स्पर्धेत पहिला उपांत्य सामना बळवंत महाविद्यालय विरुध्द पेठवडगावचे विजयसिंह यादव महाविद्यालय यांच्यात झाला. हा सामना बळवंत महाविद्यालयाने १ डाव ५ गुणांनी जिंकला. दुसरा सामना फलटणचे मुधोजी महाविद्यालय विरूध्द वाळवा येथील केएनपी महाविद्यालय यांच्यात झाला. हा सामना मुधोजी महाविद्यालयाने २ गुण व ३० सेकंद राखून जिंकला. तिसऱ्या क्रमांकाच्या सामन्यात पेठवडगावच्या विजयसिंह यादव महाविद्यालयाने वाळव्याच्या केएनपी कॉलेजवर ३ गुणांनी विजय मिळविला. बळवंत व मुधोजी महाविद्यालय या संघांत अंतिम सामना झाला. तो ‘बळवंत’ने १ डाव ४ गुणांनी जिंकला. ‘बळवंत’ची खेळाडू मोनाली शिंदे हिने ६ मिनिटे संरक्षण व ३ गडी बाद करीत अष्टपैलू खेळाडूचा पुरस्कार मिळविला, तर ज्योती शिंदे हिने ३ मिनिटे संरक्षण करीत १ गडी बाद केला. ती सर्वाेत्कृष्ट संरक्षक ठरली. सारिका शिंदे, रसिका खौरी, संगीता कोरे, तनुजा शिंदे, पूजा खौरी, अश्विनी पवार, स्नेहल मोरे, वर्षा वरूडे, प्राजक्ता गवळी, सायली बसागरे यांनी आक्रमक खेळ केला.प्राचार्य डॉ. सुरेश साळुंखे, राष्ट्रीय खेळाडू रूपाली पुणेकर यांच्या उपस्थितीत नाणेफेक करण्यात आली. प्रा. डॉ. जी. एन. मुळीक, प्रा. सुनील पाटील, प्रा. कांचन बेल्लड, प्रा. के. एन. जाधव, प्रा. एस. ए. आवटी, स्वरूप पुणेकर, दयानंद बनसोडे, प्रा. बी. ई. माळी, डॉ. सय्यद, प्रा. जमदाडे यांच्याहस्ते विजेत्या संघांना पारितोषिके देण्यात आली.प्रा. एस. एम. जाधव, प्रा. सम्राट शिंदे, डॉ. प्रा. अभिजित मुळीक, अधिकराव दिवटे, कु. पितांबरे, यशवंत चव्हाण, दीपक चव्हाण यांचे खेळाडूंना मार्गदर्शन लाभले. (वार्ताहर)
विट्याचे ‘बळवंत’ अजिंक्य
By admin | Published: November 02, 2015 11:42 PM