उचगाव : उजळाईवाडी (ता. करवीर) येथील महादेव सिद्धाप्पा बिरादार (वय ६५, रा. स्वामी विवेकानंद गल्ली, उजळाईवाडी) यांनी घरी लोखंडी अँगलला दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना रविवारी सकाळी सातच्या दरम्यान उघडकीस आली. दोन संशयित व्यक्तीच्या खंडणीच्या त्रासाला कंटाळून बिरादार यांनी आत्महत्या केली आहे अशी चर्चा घटनास्थळी होती. घराच्या भिंतीवर दोन मोबाईल नंबर आणि काही व्यक्ती दोन लाख रुपये मागत असल्याचा उल्लेख लिहिलेला होता. पोलिस त्यादृष्टीने तपास करत आहेत. बिरादार हे गेली अनेक वर्ष उजळाईवाडीत राहात आहेत. ते पत्नी भारती बिरादार यांचेसोबत राहात होते. शनिवारी पत्नीला जत-शेगाव येथे नवस फेडण्यासाठी पाठविले होते. त्यामुळे घरी रात्री ते एकटेच होते. मध्यरात्रीच त्यांनी घरातील लोखंडी अँगलला दोरीने गळफास लावून आत्महत्या केली. रविवारी सकाळी दूध घालणाऱ्याने दरवाजा वाजवला. पण आतून प्रतिसाद आला नाही. त्याने खिडकीतून आत पाहिले असता बिरादार दोरीला लटकत असलेले दिसले. त्यानंतर रहिवाशांनी गोकुळ शिरगाव पोलिस स्टेशनला माहिती दिली. घटनास्थळी पोलिस दाखल झाल्यानंतर त्यांनी मृतदेहाचा पंचनामा करून तो सी.पी.आर.कडे पाठविला. बिरादार हे निर्व्यसनी होते आणि घाटगे पाटील ट्रान्स्पोर्ट येथे ते ड्रायव्हर म्हणून काम करीत होते. यापूर्वी त्याच कंपनीतून ते निवृत्त झाले होते. पण घरी करमत नाही म्हणून पुन्हा त्यांनी नोकरी पत्करली होती. त्यांची दोन लग्ने झाली होती. पहिली पत्नी विजापूरला असून, त्यांना दोन अपत्य असल्याचे समजते. उजळाईवाडीत ते दुसऱ्या पत्नीबरोबर राहत होते. या घटनेची नोंद गोकुळ शिरगाव पोलिस ठाण्यात झाली असून पोलिस अधिक तपास करीत आहेत. संबंधित व्यक्ती कोण याचा शोध सुरु ४आत्महत्येपूर्वी त्यांनी भिंतीवर लाल स्केचपेनने दोन मोबाईल नंबर लिहिले आहेत. ४संबंधित व्यक्ती दोन लाखांची मागणी करीत होते. पैसे न दिल्यास ठार मारण्याची धमकी देत असलेला संदेश त्यांनी लिहून ठेवला होता. ४आपल्या आत्महत्येला तेच जबाबदार असून, गल्लीतील कोणालाही जबाबदार धरू नये, असा संदेश त्यांनी लिहिला असून, त्या दोन त्रास देणारे आई व मुलगी कोण आहेत. त्याविषयी पोलिस माहिती घेत आहेत. ४संबंधित फोनधारकाचा तातडीने शोध घ्यावा, अशी नातेवाईकांनी पोलिसांकडे मागणी केली आहे.
उजळाईवाडीत वृद्धाची आत्महत्या
By admin | Published: November 07, 2016 1:08 AM