लोकमत न्यूज नेटवर्क
इचलकरंजी : कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसागणिक वाढत असून, इचलकरंजी शहरातही रुग्णसंख्येचा आलेख चढताच आहे. कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे राज्य शासनाने दिवसा जमावबंदी व रात्रीची संचारबंदी करण्याचा निर्णय घेतल्यामुळे शहरातील वधू-वर मंडळींचा पुन्हा हिरमोड झाला आहे. पै-पाहुणे व मध्यस्थाला विश्वासात घेऊन दोन जिवांची रेशीमगाठ बांधली जात आहे. मात्र, वधू-वरांच्या शुभकार्यात कोरोनाच्या निर्बंधांचे विघ्न येत आहे.
गेल्यावर्षी कोरोनामुळे राज्यात कडक निर्बंध लादल्यामुळे अनेकजणांनी लग्नकार्य पुढे ढकलले. कोरोना कमी होत जाईल, अशी आशा होती. विवाह सोहळ्यावरील बंधनेही काही प्रमाणात शिथिल झाली होती. परंतु कोरोना विषाणू संसर्गाची दुसरी लाट आल्यामुळे परत एकदा मंगल कार्यास मर्यादा येत आहेत. मार्च महिन्यापर्यंत शहरात कोरोनाची परिस्थिती सामान्य होती. एप्रिल महिन्याच्या सुरुवातीपासूनच रुग्णसंख्या वाढत आहे. एप्रिल व मे महिन्यात विवाह, साखरपुडा मुहूर्त असल्यामुळे नवरदेव गुडघ्याला बाशिंग बांधून तयार आहेत. पण कोरोनामुळे त्यांचा हिरमोड झाल्याचे दिसून येत आहे.
कोरोना रुग्णांची संख्या वेगाने वाढायला लागल्यामुळे राज्यात सगळीकडे कडक निर्बंध लादण्याचा निर्णय राज्य सरकारने रविवारी घेतला. त्यामुळे विवाहेच्छुक असलेल्या नवरदेवांना आपले विवाह पुढे ढकलावे लागत आहेत. प्रशासनाने ३० एप्रिलपर्यंत कडक निर्बंध लागू करण्याची घोषणा केली आहे. याआधी ५० लोकांच्या उपस्थितीची परवानगी दिली होती. परंतु आता जमावबंदी असल्यामुळे ५० लोकांनाही एकत्र येणे अशक्य झाले आहे. त्यामुळे लग्नसोहळा स्थगित करण्याची नामुष्की मंडळींवर येत आहे.