चंद्रकांत कित्तुरे ।कोल्हापूर : एचआयव्ही पॉझिटिव्ह आणि एड्सग्रस्तांना आपला समदु:खी जोडीदार निवडण्याची संधी कोल्हापुरात रविवारी (दि. २६ नोव्हेंबर) मिळणार आहे. पॉझिटिव्हसाथी या आॅनलाईन मॅट्रीमोनी पोर्टलने त्यांच्यासाठी वधू-वर मेळाव्याचे आयोजन केले आहे.
एचआयव्ही पॉझिटिव्ह अथवा एड्सची लागण झालेल्यांच्या वाट्याला एकाकीपण येते. अशातच पती अथवा पत्नीचे निधन झालेले असेल तर जगणे मुश्कील होते. अशावेळी आपल्याला जोडीदार असावा, आपली काळजी घेणारे कोणीतरी असावे, अशी अनेकांची इच्छा असते. ती इच्छा पूर्ण करण्यासाठी उपप्रादेशिक परिवहन अधिकारी अनिल वळीव यांनी पॉझिटिव्हसाथी हे आॅनलाईन मॅट्रीमोनी पोर्टल सुरू केले. त्यावेळी ते लातूर येथे कार्यरत होते.
वळीव हे मूळचे सांगली जिल्ह्यातील ऐतवडे खुर्दचे असले तरी मिरज येथे ते स्थायिक आहेत. लातूर येथेच त्यांनी एचआयव्ही पॉझिटिव्ह लोकांसाठी पहिला वधू-वर मेळावा घेतला. आतापर्यंत असे सुमारे २५ मेळावे झाले आहेत. शेकडो एचआयव्हीबाधित आणि एड्सबाधितांनी अनुरूप वधू अथवा वर शोधून नव्याने संसार थाटला आहे .असा झाला पोर्टलचा जन्म२००६ मध्ये अनिल वळीव यांचा जवळचा एक मित्र एचआयव्ही पॉझिटिव्ह झाला. अशाच प्रकारचा आजार असलेला जोडीदार मला हवा, अशी इच्छा त्यांनी वळीव यांना बोलून दाखविली होती. ती पूर्ण होण्याआधीच या मित्राचा मृत्यू झाला. त्यानंतर लातूर येथे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी म्हणून काम करत असताना तेथील सरकारी रुग्णालयातील एका रुग्णानेही तशीच इच्छा व्यक्त केली होती. एका डॉक्टर मित्राने वळीव यांना या रुग्णाची इच्छा सांगितली. त्यानंतर वळीव यांनी एचआयव्हीबाधितांसाठी ‘पॉझिटिव्ह साथी’ आॅनलाईन मॅट्रीमोनी पोर्टल सुरू केले. या पोर्टलवर सुमारे साडेसहा हजार एचआयव्ही बाधितांनी नोंदणी केली आहे. त्यामध्ये सुमारे चार हजार पुरुष, अडीच हजार महिला आहेत. महाराष्ट्र आणि देशातूनच नव्हे, तर आॅस्ट्रेलिया, सिंगापूर, इंग्लंड, अमेरिका अशा जगभरातील अनेक देशांतील एचआयव्हीबाधितांनी या पोर्टलवर नाव नोंदविले आहे.निमित्त एड्स दिनाचे...एक डिसेंबर रोजी जागतिक एड्स दिन आहे. यानिमित्ताने कोल्हापुरातील हा मेळावा आयोजित करण्यात आला आहे. छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयात रविवारी (दि. २६ नोव्हेंबर) सकाळी ११ ते सायंकाळी ५ या वेळेत तो होणार आहे. या मेळाव्यासाठी समविचारी संघटना, संस्थांचे सहकार्य लाभले असल्याचे वळीव यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.
एचआयव्ही बाधितांसाठी काम करणाºया अनेक संस्था आहेत; परंतु या रोगाने एखाद्याची पत्नी अगर पती गेला असेल तर त्यांना ज्या पद्धतीच्या आजाराची लागण झाली त्याच पद्धतीचा जोडीदार निवडता आला, तर त्यांचे भावी आयुष्य एकमेकाला समजून घेऊन आधार देत सुखाचे जाऊ शकते. म्हणूनच आपण ही आॅनलाईन मॅट्रीमोनी पोर्टल सुरू केले आहे.-अनिल वळीव, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, बारामती