राधानगरी व गारगोटी रस्त्यास जोडणाऱ्या वाहतुकीसाठी दुवा म्हणून हा पूल महत्त्वाचा असून दुचाकी, चारचाकी वाहतुकीची मोठी वर्दळी या पुलावरून होत असते. त्यामुळे याची दुरुस्ती क्रमप्राप्त आहे.
क्रेशेर चौक ते संभाजीनगर रस्ता नगरोत्थान योजनेअंतर्गत रुंदीकरण करताना साळोखेनगरातून वाहत येणाऱ्या नैसर्गिक नाल्यावर पांडुरंगनगरी नजीक दहा वर्षांपूर्वी हा पूल विकसित करण्यात आला. मात्र, पुलाच्या उभारणीनंतर दुसऱ्या वर्षापासून दुरवस्था व्हायला सुरुवात झाली.
उभारण्यात आलेल्या नैसर्गिक पुलावरून पावसाचे पाण्याचे निर्गतिकरण होत नसल्याने प्रतिवर्षी दळवी कॉलनी, शाम हौसिंग सोसायटी, राजलक्ष्मीनगर या मोठ्या नागरी वस्त्यांमध्ये पावसाचे पाणी शिरते. नैसर्गिक नाल्याच्या पात्रालगत अंतराचे नियम धाब्यावर बसवत अतिक्रमणे करण्यात आली असल्याने पाण्याच्या प्रवाहात अडथळे निर्माण झाल्याने उभारण्यात आलेल्या पुलावर मोठा ताण पडत असल्याने पूल कमकुवत होत आहे.
पुलानजीकचा रस्तासुद्धा खचू लागला असून संबंधित प्रशासनाने तत्काळ देखभाल दुरुस्ती न केल्यास भविष्यात पूल कधी कोसळेल सांगता येत नाही.
कोट : पुलाच्या दुरुस्तीसंदर्भात प्रशासनास सुचवण्यात आले असून, नुकतीच संबंधित प्रशासनाच्या उपस्थितीत आमदार ऋतुराज पाटील यांच्यासह पाहणी करण्यात आली आहे. लवकरच हा प्रश्न मार्गी लावण्यासाठी कटिबद्ध राहू. -माजी नगरसेविका, दीपा मगदूम, राजलक्ष्मीनगर प्रभाग ७०
चौकट : सुस्त प्रशासन
चार वर्षांपूर्वी आपटेनगर प्रभागातील नैसर्गिक नाल्यावर उभारण्यात आलेल्या पुलाचा भराव पावसाळ्यात वाहून गेल्याने पूल खचला होता. त्यावेळी नगरसेवक राजू दिंडोर्ले यांनी प्रशासनास लेखी निवेदन देऊन सज्जड दम दिला. तरीही पुलाची दुरुस्ती व्हायला दोन वर्षांचा कालावधी गेला. यावरून पुलांच्या दुरुस्तीबाबतीत प्रशासन किती कार्यतत्पर आहे हे सांगायला नको.
फोटो : राजलक्ष्मीनगरातील नैसर्गिक नाल्यावर पांडुरंगनगरी येथे बांधण्यात आलेल्या पुलाची प्रचंड दुरवस्था झाली असून हा पूल कधी कोसळेल सांगता येत नाही.