साळवण : साळवण - (ता. गगनबावडा) येथील सरस्वती पुलाची दुरवस्था झाली असून, डागडुजीकडे दुर्लक्ष केल्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाबद्दल तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.गगनबावडा-कोल्हापूर राज्य मार्गावर साळवण येथे सरस्वती नदीवर १९५८ मध्ये पुलाचे बांधकाम झाले आहे. यापूर्वी कोल्हापूरहून साळवणपर्यंत व गगनबावड्याहून साळवणपर्यंत एस.टी. येत असे. प्रवाशांना होडीतून पलीकडे जाऊन एस.टी.चा प्रवास करावा लागत होता. पुलाची लांबी ५३ मीटर आहे. प्रत्येकी १७ मीटर अंतरावर असे एकूण तीन गाळे आहेत. या पुलामुळे कोकणात जाणारा नजीकचा मार्ग म्हणून या मार्गाचा वापर वाहनधारक करतात. या मार्गामुळे वेळ आणि इंधनाची मोठ्या प्रमाणावर बचत होते. या मार्गावर मोठी वाहतूक सुरू आहे.५७ वर्षे पूर्ण झालेल्या पुलाची मात्र दुरवस्था होऊ लागली आहे. साळवणकडील बाजूला मुख्य नदी प्रवाहावरच चार ते पाच फूट लांबी-रुंदीचा कठ्ठा तुटला आहे, तर पोलीस चौकीकडील बाजूच्या संरक्षक कठड्याचे दगड निखळले आहेत. दोन्ही बाजूच्या संरक्षक कठड्याचे प्लॅस्टर उखडले आहे. मुख्य पुलाच्या दोन्ही बाजूला सुमारे पंधरा ते वीस फूट अंतरात सिमेंटचे खांब व त्यातून लोखंडी पाईप असून, या सर्व लोखंडी पाईप गंजून गेल्या आहेत. पाईप तुटून जमिनीवर पडल्या आहेत. परिसरातील साखर कारखाने सुरू झाल्यामुळे वाहतुकीत भर पडली आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने त्वरित पडझडीची दुरुस्ती करावी, अशी मागणी होत आहे. (वार्ताहर)
साळवण येथील नदीवरील पुलाची दुरवस्था
By admin | Published: January 07, 2015 9:58 PM