मिलिंद देशपांडे
दत्तवाड : शिरोळ तालुक्यातील महापुराला कारणीभूत ठरत असलेल्या मांजरी-अंकली या कृष्णा नदीवरील पुलाचा भराव काढण्याची मागणी एकीकडे हात असताना कर्नाटक सरकार मात्र कल्लोळ-येडूर असा नवीन पूल बांधून नवीन भराव घालत असल्याने शिरोळ तालुका पुन्हा एकदा महापुराच्या संकटात लोटला जाण्याची भीती व्यक्त होत आहे.
२००५, २०१९ व २०२१ अशा तीन महापुराने संपूर्ण शिरोळ तालुका उद्ध्वस्त झाला आहे. अंकली-मांजरी दरम्यान कृष्णा नदीवरील बांधलेला कर्नाटक शासनाने पूल व त्याच्या दोन्ही बाजूला घातलेला भराव हाच या पुराचे कारण असल्याचे तज्ज्ञ मान्य करतात. मात्र, हा भराव काढून तेथे पिलर करावेत, अशी मागणी शिरोळ तालुक्यातून होत असतानाच कर्नाटक शासनाने खिद्रापूर-जुगूळ, टाकळी-चंदूर असे दोन नवीन पूल बांधण्यास सुरुवात केली आहे.
येथील भराव काढावा व पिलर करावेत, अशी शिरोळ तालुक्यातील कृष्णा, पंचगंगा, दुधगंगा नदीकाठावरील गावांतून मागणी सुरू असतानाच कर्नाटक शासनाने कल्लोळ-येडूर हा नवीन पूल बांधण्यास सुरुवात केली आहे. यापूर्वी तेथे कोल्हापूर पद्धतीचा बंधारा होता. पण तो कमकुवत होऊन महापुरात त्याचा काही भाग वाहून गेला. यानंतर तेथील वाहतूक बंद आहे. पण पुढे दोन किलोमीटरवर अंकली-मांजरी पूल असल्याने वाहतूक त्या पुलावरून सुरू होती.
पण शासनाने वाहून गेलेल्या बंधारा लगतच नवीन पूल बांधण्यास सुरू केली असून, या पुलाला देखील दोन्ही बाजूला भराव घातला जाणार आहे. त्यामुळे आधीचा अंकली-मांजरी पूल याबरोबरच खिद्रापूर-जुगूळ व टाकळी-चंदूर हे दोन पूर्ण होत असतानाच यामध्ये या चौथ्या पुलाचे काम सुरू असल्याने महापुराचे पाणी खाली वाहून जाण्यास मोठा अडथळा निर्माण होणार आहे. पंधरा किलोमीटर अंतरामध्ये चार पूल झाल्याने महापुराचे पाणी जास्त दिवस राहणार आहे. यामुळे शिरोळ तालुका महापुराच्या पाण्याने वेढला जाण्याची भीती व्यक्त होत आहे.