आजरा : वरिष्ठ पातळीवर शिवसेना-भाजप आघाडीत झालेली बिघाडी, जि. प. वं. पं. स.करिता असणारी इच्छुकांची प्रचंड संख्या, निवडणुकीत अधिकृत उमेदवारी न मिळाल्यास इच्छुकांची सुरू असलेली पर्यायांची चाचपणी यामुळे आजऱ्यात राजकीय गोंधळाची विचित्र परिस्थिती निर्माण झाली असून, आता स्थानिक नेतृत्वाचीच ‘कसोटी’ लागण्याची शक्यता आहे.आजरा जि. प. मतदारसंघात ‘ताराराणी’कडून अशोक चराटी व राष्ट्रवादी-राष्ट्रीय काँगे्रसकडून जयवंतराव शिंपी यांची उमेदवारी निश्चित समजली जाते. आजरा पंचायत समिती गणाकरिता राष्ट्रवादी-राष्ट्रीय काँगे्रसकडून बशीर खेडेकर, तर ताराराणीकडून अबुताहेर तकीलदार प्रचाराला लागले आहेत.अनिरुद्ध (बाळ) केसरकर यांनीदेखील ‘एकला चलो रे’ची भूमिका घेत प्रचाराची ‘हवा’ तयार करण्यास सुरुवात केली आहे. ‘तरुणाई’ प्रामुख्याने केसरकर यांच्यासाठी कामाला लागली आहे, तर शिवसेनेकडून आेंकार माद्याळकर यांचे नाव पुढे येत आहे. पेरणोली पं. स. गणात राष्ट्रवादीकडून उदय पवार निश्चित असताना ‘ताराराणी’चा उमेदवारीचा गुंता अद्याप सुटलेला नाही. शिवसेनेने देवराज माडभगत यांचे नाव पुढे आणले आहे, तर ‘तारारणी’कडून सहदेव नेवगे, सुरेश पाटकर, सचिन पाटील यांच्यासह ‘डझनभर’ इच्छुक आहेत. ‘ताराराणी’वरील आबाजींची नाराजी कायम आहे.उत्तूर जि. प.मध्ये राष्ट्रवादीचे वसंतराव धुरे, राष्ट्रीय काँगे्रसचे उमेश आपटे यांनी जोरदार प्रचार सुरू केला आहे. ताराराणीतून मारुती घोरपडे की विश्वनाथ करंबळी? हा प्रश्न अद्याप अनुत्तरीत आहे. जि. प.मध्ये तिरंगी लढत होणार असल्याने पंचायत समिती उत्तूर व भादवण गणात डझनभर उमेदवार राहण्याची शक्यता आहे.रमेश ढोणुक्षे, विकास पोटे, गिरीष देसाई हे उत्तूर पं. स.करिता महाआघाडी, राष्ट्रवादी व राष्ट्रीय काँगे्रसकडून आघाडीवर आहेत, तर विजय सावेकर, चंद्रकांत गोरूले, महादेव पाटील चर्चेत आहेत.कोळिंद्रे जि. प. मतदारसंघ ताराराणी आघाडीच्या दृष्टीने संवेदनशील बनला आहे. सुनीता रेडेकर की हिरा केसरकर? हा प्रश्न माघारीपर्यंत सुटेल असे वाटत नाही. याचवेळी श्रीमती अंजना रेडेकर हे राष्ट्रीय काँग्रेसमधून नाव वेळेत निश्चित झाले आहे.रचना होलम, वर्षा बागडी वगळता येथेही उमेदवारीचा गोंधळ आहेच. शिवसेनेने येथून जि. प. निवडणुकीला सामोरे जाण्याची तयारी केली आहे. ‘राष्ट्रवादी’च्या काही कार्यकर्त्यांनी श्रीमती अंजनाताई रेडेकर यांच्या उमेदवारीस पाठिंबा दर्शविला आहे. त्यामुळे राष्ट्रवादीतर्फे पक्षाचा अधिकृत उमेदवार कोण? याबाबत सध्या चर्चाच थंडावली आहे. एकंदर तालुक्यात आघाड्यांचा सावळा गोंधळ सुरूच आहे.
आजऱ्यात आघाड्यांचा सावळा गोंधळ
By admin | Published: January 30, 2017 12:26 AM