अर्जुनवाड : अर्जुनवाड (ता. शिरोळ) येथे आज शनिवारी विठ्ठल मंदिर येथे आंदोलन अंकुशच्यावतीने कृषी पंपधारकांचा मेळावा होणार आहे. २०१९ मधील महापुरानंतर जवळपास पाच महिने कृषी पंप बंद असताना महावितरणकडून आकारण्यात आलेली बिले माफ झाली पाहिजेत. या पार्श्वभूमीवर जयसिंगपूर महावितरण कार्यालयावर २ आॅगस्ट रोजी मोर्चा काढण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर शेतक-यांची बैठक आयोजित केली असल्याचे आंदोलन अंकुशचे धनाजी चुडमुंगे यांनी सांगितले. यावेळी संजय चौगुले, बाबासोा कदम, अनिल सुतार उपस्थित होते. -
मातीचा ढीग हटवा
जयसिंगपूर : शहरातील अकराव्या गल्लीतील इंगळे दवाखान्याशेजारी रस्त्यावरच मातीचा ढीग टाकण्यात आला आहे. ड्रेनेजच्या कामावेळी रस्ता उखरून काढण्यात आलेली माती त्याच ठिकाणी असल्यामुळे पावसाचे पाणी साचत आहे. दोन दिवसांपूर्वी यामधील काही माती ट्रॅक्टरद्वारे नेण्यात आली. मात्र, अजूनही त्याठिकाणी माती तशीच असल्यामुळे वाहतुकीबरोबर पावसाचे पाणी साचत असल्यामुळे नागरिकांना ये-जा करणे अडचणीचे ठरत आहे.
-
शिरोळमध्ये बेशिस्त पार्किंग
शिरोळ : येथील मध्यवर्ती प्रशासकीय कार्यालयासमोर बेशिस्त वाहने लावली जात आहेत. त्यामुळे याठिकाणी कामानिमित्त येणा-या नागरिकांना त्याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे. बेशिस्त पार्किंगमुळे वाट शोधत कार्यालयात जावे लागत आहे. त्यामुळे बेशिस्त वाहनांवर कारवाई करण्याची मागणी होत आहे.