जयसिंगपूर : शहरातील डेबॉन्स कॉर्नर परिसरातील चौकात मोठ्या प्रमाणात बेशिस्त वाहने लावली जात आहेत. त्यामुळे या परिसरात वारंवार वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागत आहे. या मार्गावर हॉस्पिटल, मेडिकल असल्याने रुग्णांना घेऊन येणाऱ्या वाहनांची संख्याही आहे. मात्र, बेशिस्त वाहनांमुळे वाहनधारकांना तसेच पादचाऱ्यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.
---------------------
वाहतुकीचे नियोजन गरजेचे
शिरोळ : शिरोळ ते नृसिंहवाडी मार्गावर रस्ता रुंदीकरणाचे काम सुरू आहे. मात्र, यामुळे वारंवार वाहतुकीची कोंडी होत आहे. रस्त्याचे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी वाहतुकीचे योग्य नियोजन लावण्याची गरज आहे. कामानिमित्त या मार्गावरून ये-जा करणाऱ्या वाहनधारकांना वारंवार वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे पोलीस प्रशासनाने याठिकाणी वाहतुकीचे योग्य नियोजन करण्याची गरज आहे.
------------------------
विनामास्क नागरिकांमुळे कोरोनाचा धोका
जयसिंगपूर : शहरात विनामास्क फिरणाऱ्यांची संख्या अजूनही दिसत आहे. त्यामुळे दररोज दहा ते पंधरा नवे कोरोना रुग्ण मिळून येत आहेत. पालिका व पोलीस प्रशासनाने विविध ठिकाणी थांबून विनामास्क नागरिकांवर दंडात्मक कारवाईची मोहीम राबविण्याची गरज आहे. तसेच सोशल डिस्टन्सिंग न पाळणाऱ्यांवरही कारवाईची गरज आहे.