गडहिंग्लज : येथील सुपर अभिनव अॅकॅडमीतर्फे जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून पर्यावरण संरक्षणासाठी उद्या (शनिवारी) 'माझे झाड... माझी जबाबदारी' हा उपक्रम आयोजित केला आहे.
या उपक्रमातंर्गत अॅकॅडमीच्या विद्यार्थ्यांनी एक रोप लावायचे आहे. त्या रोपासोबत सेल्फी काढून त्याचा फोटो अॅकॅडमीच्या गुगल फॉर्मवर लोड करावयाचा आहे. १ वर्षानंतर पुन्हा त्याच वाढलेल्या रोपासोबत फोटो काढून पुन्हा अपलोड करायचा आहे. त्यानंतर अॅकॅडमीद्वारे परिक्षण करून योग्य ते बक्षीस देण्यात येणार आहे. अधिकाधिक विद्यार्थ्यांनी यामध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन प्रा. एस. बी. पाटील, डॉ. अमोल पाटील यांनी केले.
-----------------------
२) आपटे कोविड सेंटरला २५ हजारांची मदत
गडहिंग्लज : मुमेवाडी (ता. आजरा) येथे जि. प. सदस्य उमेश आपटे यांनी कोरोनाग्रस्तांच्या सेवेसाठी सुरू केलेल्या कोविड सेंटरला आज-याचे माजी उपनगराध्यक्ष व विद्यमान नगरसेवक आलम नाईकवाडे यांनी २५ हजारांची आर्थिक मदत केली. उमेश आपटे यांच्याकडे ही मदत सुपूर्द केली. यावेळी अॅड. जावेद दीडबाग, शरीफ खेडेकर, जानबा गावडे आदी उपस्थित होते.
-------------------------
३) 'संत गजानन'च्या दोन शिक्षकांना पुरस्कार
गडहिंग्लज : महागाव येथील संत गजानन महाराज आयुर्वेद महाविद्यालयातील क्रीडा विषय विभागप्रमुख डॉ. विशाल पाटील यांना उत्कृष्ट संशोधक तर प्रपाठक डॉ. स्वरूप कुलकर्णी यांना उत्कृष्ट शिक्षक हा आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे. तमिळनाडू येथील व्ही. डी. गुड आंतरराष्ट्रीय अभियांत्रिकी, विज्ञान व चिकित्सा संशोधन संस्थेकडून प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह देवून गौरविण्यात आले.
डॉ. पाटील यांनी 'वेगवेगळ्या शारीरिक देह प्रकृतीच्या व्यक्तीमधील हिमोग्लोबीन आणि पीक एक्स्पायरेटरी फ्लो रेट यामधील संबंधाचा अभ्यास' याविषया संशोधन केले आहे. डॉ. कुलकर्णी हे रचना शरीर विभागप्रमुख व प्रपाठक असून आंतरराष्ट्रीय नियतकालिकेत ५० हून अधिक प्रबंध प्रकाशित झाले आहेत.
-------------------------
४) गडहिंग्लज तालुक्यातील ३३ गावात प्रकाश सापळे
गडहिंग्लज : हुमणीमुक्त शिवारसाठी कृषी विभागाने तालुक्यातील ३३ गावांत प्रकाश सापळे लावण्यात आले आहेत, अशी माहिती तालुका कृषी अधिकारी हरिदास बोंगे यांनी दिली.
तालुक्यात ऊस पीक मोठ्या प्रमाणात घेतले जाते. मात्र, हुमणी किडीच्या वाढत्या प्रमाणामुळे उसाला फटका बसत असल्याने शेतकरी हैराण झाले आहेत.
हुमणीवर नियंत्रण मिळविण्यासाठी मुत्नाळ व हिटणीतील काही शेतक-यांनी केलेला प्रकाश सापळ्यांचा प्रयोगामुळे हुमणी नियंत्रणात आली आहे. त्याची दखल घेवून कृषी विभागाने ३३ गावांत हे सापळे लावण्यात आले असून त्याला १५० शेतक-यांनी सहकार्य केले आहे.
तालुक्यातील दुंडगे, कडलगे, हरळी, बसर्गे, नूल, बेळगुंदी, हणमंतवाडी, शेंद्री, हसूरचंपू, हिरलगे, नांगनूर, भडगाव, येणेचवंडी, चन्नेकुप्पी, अत्याळ, खमलेहट्टी, शिप्पूर, अरळगुंडी, हेब्बाळ, खणदाळ, कौलगे, चिंचेवाडी, हुनगिनहाळ, नौकुड, माद्याळ, तनवडी, हनिमनाळ, ऐनापूर, इंचनाळ, सरोळी, करंबळी आदी गावात हे सापळे लावण्यात आले आहेत.
कृषी पर्यवेक्षक, मंडल अधिकारी, कृषी सहायक यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम सुरू आहे.