जिल्हाधिकारी दौलत देसाई यांचे आदेश
कोल्हापूर : जिल्हयामध्ये लॉकडाऊनची मुदत ३१ जानेवारी २०२१ पर्यंत रात्री १२ वाजेपर्यंत वाढविण्यात येत असल्याचे आदेश जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी गुरुवारी दिले.
यापूर्वीच्या आदेशात नमूद केलेली प्रतिबंधित बंद क्षेत्र व सूट, वगळण्यात आलेली क्षेत्रे कायम ठेवण्यात येत आहेत. तसेच वेळोवळी परवानगी दिलेल्या बाबी-क्षेत्र पूर्ववत सुरू राहतील. याअंतर्गत दिलेल्या आदेशाचे पालन न करणाऱ्या घटकांवर फौजदारी कारवाई करण्यात येईल, असेही आदेशात नमूद आहे.
--
‘माझी वसुंधरा’ अभियान आजपासून
कोल्हापूर : माझी वसुंधरा अभियानाची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यासाठी वसुंधरेप्रती आपली जबाबदारी म्हणून प्रत्येक नागरिकांनी १ ते १५ जानेवारी या कालावधित हरितशपथ घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी गुरुवारी केले.
जिल्ह्यातील सार्वजनिक मंडळे, हास्यक्लब, तरुण मंडळे, शासकीय, राजकीय, सामाजिक तसेच निमशासकीय, कार्यालये तसेच संस्थांमध्ये कार्यरत कर्मचारी, व्यक्ती यांनी माझी वसुंधरा अभियानांतर्गत हरितशपथ घ्यावी. त्याची नोंद www.majhivasundhara.in या वेब पोर्टलवर करावी. राबविण्यात आलेल्या उपक्रमांची माहिती daokolhapur@gmail.com या ई-मेल वर पाठवावी, असेही आवाहन करण्यात आले आहे.
--
दारिद्रय रेषेखालील घटकांना खासगी जमीन अनुदान स्वरुपात
कोल्हापूर : कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबलीकरण व स्वाभिमान योजनेंतर्गत दारिद्रय रेषेखालील भूमिहिन शेतमजूर अनुसूचित जाती व नवबौध्द घटकांना २ एकर बागायत किंवा ४ एकर जिराईत खासगी जमीन खरेदी करून १०० टक्के अनुदान स्वरुपात देण्यात येत असल्याची माहिती समाज कल्याणचे सहायक आयुक्त विशाल लोंढे यांनी दिली.
अनुसूचित जातीच्या दारिद्रय रेषेखालील भूमिहिन शेतमजूर कुटुबांचे उत्पन्नाचे स्तोत्र वाढावे व त्यांना कायमस्वरुपी उत्पन्नाचे साधन मिळावे, यासाठी ही योजना राबवली जाते. ही जमीन जिल्हा समाज कल्याण कार्यालय खरेदी करणार असून, जे जमीन मालक रेडिरेकनरनुसार जमीन विक्रीस तयार आहेत, त्यांनी कागदपत्रांसह सहायक आयुक्त, समाज कल्याण, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, विचारे माळ, कोल्हापूर येथे संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
--