कोल्हापूर : खासगी दुचाकी वाहनांची जुनी नोंदणी मालिका एमएच०९-एफआर ही १८ डिसेंबरपर्यंत संपणे अपेक्षित आहे. त्यानंतर प्रादेशिक परिवहन कार्यालयामार्फत नवीन दुचाकी नोंदणी मालिका एमएच०९-एफएस २१ डिसेंबर रोजी सुरू करण्यात येत आहे. पसंती क्रमांकाचे अर्ज त्याच दिवशी सकाळी पावणेदहा ते दुपारी दोन या वेळेतच स्वीकारण्यात येतील, अशी माहिती प्रादेशिक परिवहन अधिकारी डॉ. स्टिव्हन अल्वारिस यांनी दिली.
एखाद्या नोंदणी क्रमांकासाठी एकापेक्षा जास्त अर्ज आल्यास त्या क्रमांकाचा लिलाव २२ डिसेंबरला दुपारी चार वाजता कार्यालयाच्या सभागृहात घेण्यात येईल. अर्जदार व प्राधिकृत प्रतिनिधी यांनाच लिलावास उपस्थित राहण्याची परवानगी देण्यात येईल. त्यासाठी ओळखपत्र बंधनकारक असेल, असे डॉ. अल्वारिस यांनी कळविले आहे.
----
लोकशाही दिनासाठी परवानगी
कोल्हापूर : अनलॉकअंतर्गत दूरचित्रवाणी परिषदेद्वारे अथवा अर्जदारांच्या संमतीने शक्य असल्यास गुगल मीट, झूम ॲपचा वापर करून लोकशाही दिनाचे आयोजन करण्याचे निर्देश सहसचिव महेंद्र वारभुवन यांनी मंगळवारी दिले.
ज्या ठिकाणी कोरोनाचा प्रादुर्भाव कमी व अर्जदारांना कार्यालयात बोलाविणे शक्य असेल त्या ठिकाणी सूचनांचे काटेकोरपणे पालन केल्यानंतरच अर्जदारांना छोट्या संख्येच्या गटांत समक्ष बोलावून लोकशाही दिनाचे आयेाजन करण्यात यावे, असे परिपत्रकात नमूद आहे.
......................................
क्रीडा विभागातर्फे नियमावली जाहीर
कोल्हापूर : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर क्रीडा विभागामार्फत मानक कार्यप्रणाली (SOP) प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. यामध्ये खेळाचे वैयक्तिक खेळप्रकार, सांघिक खेळप्रकार, प्रशिक्षण केंद्र, स्पोर्ट क्लब्स, सराव केंद्रे, खेळाडू, मार्गदर्शक, क्रीडासंकुले यांनी पाळावयाची खबरदारी याची माहिती https://sports.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आलेली आहे, अशी माहिती जिल्हा क्रीडाधिकारी डॉ. चंद्रशेखर साखरे यांनी दिली.
----
इंदुमती गणेश