कोल्हापूर : राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान- अन्नधान्य पिके अंतर्गत रब्बी हंगामामध्ये बियाणे वितरण, पीक प्रात्यक्षिके, सुधारित कृषी अवजारे व सिंचन साधने यासाठी इच्छुक शेतकऱ्यांनी महाडीबीटी प्रणालीद्वारे अर्ज करावेत, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी ज्ञानदेव वाकुरे यांनी केले आहे.
हरभरा बियाणासाठी १० वर्षांच्या आतील वाणास २५ रुपये, त्यावरील वाणास १२ प्रति किलो व रब्बी ज्वारी बियाणासाठी १० वर्षांच्या आतील वाणास ३० रुपये व त्यावरील वाणास १५ रुपये किलो अनुदान देण्यात येणार आहे. जैविक खते, सूक्ष्म मूलद्रव्ये, भूसुधारके व पीक संरक्षण औषधी यासाठी शेतकऱ्याला एक एकरच्या मर्यादेत एका पिकासाठी २ ते ४ हजार मर्यादेत डीबीटी तत्त्वावर अनुदान दिले जाईल. शेतकऱ्यांना नोंदणीसाठी ३० ऑगस्ट ते १० सप्टेंबरपर्यंत मुदत देण्यात आली असून, निवड ऑनलाइन लॉटरी पद्धतीने होईल.
---
डाक अदालत ३० सप्टेंबरला
कोल्हापूर : प्रवर अधीक्षक डाकघर यांच्या वतीने ३० सप्टेंबर रोजी सकाळी ११ वाजता डाक अदालतीचे आयोजन करण्यात आले आहे.
यात पोस्टाच्या सेवेविषयी किंवा कामकाजाबद्दल ज्या तक्रारींचे निवारण सहा आठवड्यांच्या आत झालेले नाही अशा तक्रारींची दखल घेतली जाईल. विशेषत: टपाल वस्तू, मनीऑर्डर, बचत खाते, प्रमाणपत्र अशा तक्रारी विचारात घेतल्या जातील. त्यांचा उल्लेख सर्व तपशिलासह केलेला असावा. संबंधितांनी आपली तक्रार रूपेश सोनावले, प्रवर अधीक्षक डाकघर, कोल्हापूर विभाग, कोल्हापूर- ४१६००३ यांच्या नावे दोन प्रतींसह ९ सप्टेंबरच्या आत पोहोचेल अशा रीतीने पाठवावी.
---