कुरुंदवाड : हेरवाड (ता. शिरोळ) येथील कन्या शाळेजवळील नादुरुस्त झालेली कूपनलिका दुरुस्त करण्यात आल्यामुळे ग्रामस्थांतून समाधान व्यक्त होत आहे. गेल्या काही दिवसापासून ही कूपनलिका नादुरुस्त झाली होती. त्यामुळे ग्रामस्थांची मोठी गैरसोय होत होती. अखेर ग्रामपंचायत प्रशासन विभागाने ही कूपनलिका दुरुस्त केल्यामुळे ग्रामस्थांतून समाधान व्यक्त होत आहे.
-
शहरात प्लास्टिकचा वापर वाढला
जयसिंगपूर : शहरात प्लास्टिकचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. काही छोट्या मोठ्या व्यावसायिकांकडून सर्रासपणे प्लास्टिक पिशव्यांचा वापर होत आहे. त्यामुळे पालिकेने अशा व्यावसायिकांवर कारवाई करण्याची गरज आहे. प्लास्टिक बंदी असतानाही प्लास्टिकचा वापर होत असल्याने पालिका कोणती कार्यवाही करते, याकडे लक्ष लागून राहिले आहे.
--
शिरोळमध्ये गतिरोधकाची आवश्यकता
शिरोळ : शहरातील मध्यवर्ती शासकीय कार्यालयासमोर सुरक्षेच्या दृष्टीने जयसिंगपुरकडे जाणाऱ्या मार्गावर पांढरे पट्टे मारण्यात आले आहेत. मंगळवारी सकाळी याच ठिकाणी ऊस मोकळा करुन निघालेला ट्रॅक्टरच्या पाठीमागील ट्रॉलीचे लॉक निघाल्याने ट्रॉली रस्त्याच्या बाजूला घसरली. सुदैवाने कोणतीही दुर्घटना झाली नसली तरी याठिकाणी गतिरोधकाची आवश्यकता आहे.