बुबनाळ : कवठेगुलंद (ता. शिरोळ) येथील माळभाग व गावाला जोडणाऱ्या मुख्य रस्त्याची दुरवस्था झाली आहे. ऐन पावसाळ्यात रस्ता खराब झाल्याने वाहनधारकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाने लक्ष देऊन तातडीने रस्ता दुरुस्त करावा, अशी मागणी होत आहे. कृष्णा नदीपलीकडील सात गावांत मुख्य केंद्र म्हणून कवठेगुलंद फाटा म्हणून ओळखला जातो. या मार्गावरून कर्नाटकसह नृसिंहवाडी, कुरुंदवाड परिसरात लहान-मोठी वाहनांची वाहतुक सुरू असते.
-
गणेशवाडीमध्ये पुलाची प्रतीक्षा
बुबनाळ : गणेशवाडी (ता. शिरोळ) येथील गावभाग व माळभागला जोडणाऱ्या पुलाच्या कामाची मुदत संपूनही काम अर्धवट अवस्थेत आहे. पुलाच्या दोन्ही बाजूस रस्त्याचे काम रखडले असल्यामुळे पावसाळ्यात नागरिकांची गैरसोय होत आहे. तरी याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाने लक्ष देऊन तातडीने पुलाचे काम पूर्ण करावे, अशी मागणी ग्रामस्थ करीत आहेत.
--
औरवाडमध्ये बेकायदेशीर वाळूची विक्री
बुबनाळ : नृसिंहवाडी-औरवाड पुलावरून वाळू वाहतूक सुरू आहे. याकडे महसूल प्रशासनासह पोलिसांचे दुर्लक्ष होत आहे. औरवाड फाटा येथे पोलीस बंदोबस्तातील पोलीस गेल्यानंतर वाळूच्या ट्रक या इशारावरून सोडल्या जात आहेत. पर्यावरण विभागाने वाळू उपसास बंदी घातली असताना देखील औरवाडमधून एजंटाकडून वाळूची वाहतूक तालुक्यात सुरू आहे. दहाचाकी ट्रकमधून सात ते आठ ब्रास वाळूची विक्री केली जात आहे. तरी याकडे तलाठी, मंडल अधिकारी केव्हा कारवाई करणार, याकडे लक्ष लागून राहिले आहे.