कबनूर : येथील कोविड केंद्रामध्ये काम करणारे ग्रामपंचायत कर्मचारी दिलीप शिंदे यांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्याने त्यांच्यावर इचलकरंजी येथील आयजीएम येथे उपचार सुरू होते. त्यांची प्रकृती गंभीर बनल्याने त्यांना कोल्हापुरातील खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल केले. शिंदे यांची घरची परिस्थिती बेताची असल्याने उपचाराची जबाबदारी ग्रामपंचायतीने घ्यावी, या मागणीचे निवेदन सुनील इंगवले, सुधाकर कुलकर्णी, राहुल मालपुरे, महावीर लिगाडे यांनी ग्रामपंचायतीस दिले. याची दखल घेत सरपंच शोभा पवार, उपसरपंच सुधीर पाटील व ग्रामसेवक बी. टी. कुंभार यांनी मदत करण्याचे मान्य केले.
कोविड केंद्रामधील रुग्णांना जेवण वाटप
कबनूर : येथील रावसाहेब लिगाडे व कुटुंबीयांनी कबनूर कोविड केंद्रामधील रुग्ण व उपचार देणाऱ्या सर्व स्टाफला जेवण वाटप करून उत्कृष्ट आरोग्य सेवेबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. कोरोनापासून मुक्त झालेली व्यक्ती पुन्हा कोरोना हॉस्पिटलचे नाव काढण्यासाठी धजावत नाही. परंतु येथील लिगाडे कुटुंबीय कोरोनाबाधित झाल्याने कबनूर कोविड केंद्रामध्ये दाखल झाले. याठिकाणी मिळालेले उपचार व आपुलकी रुग्ण बरे होण्यासाठी ग्रामपंचायतीने घेतलेली काळजी यामुळे सर्व कुटुंब कोरोनामुक्त झाले. सर्व उपचार व सेवा मोफत असूनही चांगली देखभाल होते.