कोल्हापूर : बागवान समाजाच्या सर्व सभासदांची वार्षिक सर्वसाधारण सभा मंगळवारी (दि. १६) दुपारी तीन वाजता आहे. दसरा चौकातील शाहू स्मारक भवनात सभा होणार असून, कोरोनाच्या नियमांचे पालन सर्वांनी करावे, असे आवाहन समाजाच्या वतीने केले आहे.
रद्दी, जुने कपडे संकलन
कोल्हापूर : एकटी संस्थेच्या वतीने महिला दिनानिमित्त न्यू पॅलेस येथील सन सिटी सोसायटीमध्ये रद्दी, जुने कपडे संकलन उपक्रम राबविला. यावेळी नागरिकांना ओला व सुका कचरा संकलित करण्याबाबत माहिती दिली. यावेळी अभिजित पाटील, संग्राम पाटील, मंजू अगरवाल, रिधिमा सार्थे, समृद्धी शिपुकडे, दिया पाटील, जैनुद्दीन पन्हाळकर, सविता कांबळे उपस्थित होते.
फोटो : १३०३२०२१ कोल एकटी न्यूज
ओळी : कोल्हापुरातील एकटी संस्थेच्या वतीने सन सिटी सोसायटीत रद्दी, जुने कपडे संकलन उपक्रम राबविला.
फुलेवाडीत बालवाडी शिक्षिका शिक्षण अभ्यासक्रम
कोल्हापूर : फुलेवाडी येथील सद्गुरू शिक्षण संस्थेमार्फत शिवाजी विद्यापीठाच्या आजीवन अध्ययन विस्तार विभागाचा बालवाडी शिक्षिका शिक्षण अभ्यासक्रम (इंग्रजी माध्यम) १ एप्रिलपासून सुरू होत आहे. इच्छुकांनी ३१ मार्चपर्यंत संपर्क साधून प्रवेश निश्चित करण्याचे आवाहन संस्थेमार्फत केले आहे.
पारंपरिक वेशभूषेत मनीषा मोरे यांची बाजी
कोल्हापूर : मनसे जनहित कक्षाच्या वतीने ‘मराठी राजभाषा दिना’निमित्त घेण्यात आलेल्या पारंपरिक वेशभूषा स्पर्धेत मनीषा मोरे यांनी प्रथक क्रमांक पटकाविला. द्वितीय क्रमांक सीमा चोपडे, तृतीय क्रमांक आलिया रुकडीकर आणि चतुर्थ क्रमांक अमृता जर्दे यांना मिळाला. मराठी स्वाक्षरी स्पर्धेत अवधूत मानकर यांना प्रथम क्रमांक मिळाला. विनय रुईकर यांना द्वितीय क्रमांक, महेश जामसांडेकर यांना तृतीय क्रमांक आणि रमीझा रुकडीकर यांना चतुर्थ क्रमांक मिळाला. उपमहापौर ज्योत्स्ना पवार, बाळासाहेब मेढे यांच्या हस्ते बक्षीस वितरण झाले.
कोटीतीर्थ तलाव गाळ, कचरामुक्त करा
कोल्हापूर : कोटीतीर्थ तलावामध्ये मासे, कासवे मृत्यू होण्याचे प्रमाण वाढले आहे. विनापरवाना मासेमारी सुरू आहे. तलावात गाळ साचल्यामुळे दुर्गंधी पसरली आहे. त्यामुळे तलाव गाळ व कचरामुक्त करा, अशी मागणी ऑल इंडिया मजलीस ए इत्तेहादुल मुस्लिमीन (एमआयएम) यांच्या वतीने महापालिकेच्या प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. रंकाळा तलाव, कळंबा तलाव याप्रमाणे कोटीतीर्थ तलावाचेही संवर्धन व सुशोभीकरण करा, अशीही मागणी केली. यावेळी पश्चिम महाराष्ट्र युवा प्रवक्ते शाहिद शेख, इरफान बिजली, अय्याज मुजावर, आदी उपस्थित होते.
नाईट कॉलेजमध्ये मोडी लिपी अभ्यासक्रम
नाईट कॉलेज ऑफ आर्टस ॲण्ड कॉमर्स, मराठी विभागाच्या वतीने २५ मार्च ते २५ एप्रिल दरम्यान, सायंकाळी ६ ते ८ या वेळेत मोडी लिपी प्रमाणपत्र अभ्यासक्रम घेण्यात येणार आहे. प्रवेशासाठी दहावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. इच्छुकांनी मराठी विभागप्रमुख डॉ. अरुण शिंदे यांच्याशी २० मार्चपर्यंत संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे.
सावित्रीबाई फुले यांना अभिवादन
कोल्हापूर : सिद्धार्थनगर येथील समृद्धी महिला सामाजिक संस्था, अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद यांच्या वतीने सावित्रीबाई फुले यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस अभिवादन करण्यात आले. यावेळी स्वाती काळे, दादासाहेब चोपडे, संगीता बनगे, आदी उपस्थित होते.
उत्पन्न दाखल्याची अट शिथिल करा
कोल्हापूर : दिव्यांगांना संजय गांधी योजनेतील पेन्शनधारकांना उत्पन्न दाखला मार्च महिन्यापर्यंत जमा करण्याची सक्ती केली जात आहे. परंतु कोरोनामुळे दाखले काढणे शक्य होत नाही. त्यामुळे यंदाच्या वर्षी दाखला देण्याची अट शिथिल करावी, अशी मागणी शिवसेना अपंग साहाय्य सेनेच्या वतीने पत्रकाद्वारे केली आहे. दिव्यांगांना अंत्योदय रेशन कार्ड मिळावे, गॅस सिलिंडरमध्ये ५० टक्के सवलत मिळावी, लॉकडाऊनमधील वीज बिल माफ करावे, अशाही मागण्या केल्या. आठ दिवसांत मागण्या मान्य केल्या नाहीत तर जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढू, असा इशारा दिला आहे.