जयसिंगपूर : धरणगुत्ती (ता. शिरोळ) येथील प्रभाग क्रमांक दोनचे केंद्र क्रमांक एक पूर्वीप्रमाणे जयप्रकाश हौसिंग सोसायटीमधील सावित्रीबाई फुले विद्यामंदिर येथे कायम ठेवण्यात यावे, अशी मागणी निवडणूक आयुक्तांकडे मतदारांनी निवेदनाद्वारे केली आहे. केंद्र क्रमांक एक हे जयप्रकाश हौसिंग सोसायटीमधील विद्यामंदिर येथे, तर प्रभाग क्रमांक दोन हे केंद्र विद्यामंदिर मळाभाग येथे आहे.
मतांच्या जुळवाजुळवीत कार्यकर्ते व्यस्त
शिरोळ : ग्रामपंचायत निवडणुकीच्या निमित्ताने मतांची जुळवाजुळव सुरू झाली आहे. सर्वच आघाड्यांचे प्रमुख व कार्यकर्ते पै-पाहुणे, भावकीला गळ घालून मतांची जुळवाजुळव करण्यात व्यस्त आहेत. शिरोळ तालुक्यात ३३ ग्रामपंचायतींच्या ४०१ जागांसाठी ९९२ उमेदवार आपले भवितव्य आजमावत आहेत. निवडणुकीला पक्षीय रंग नसला तरी भेळमिसळ आघाड्यांच्या माध्यमातून निवडणुकीत रंगत आली आहे. एकेक मताची जुळवाजुळव कार्यकर्त्यांकडून सुरू असल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. बाहेरगावी गेलेल्या मतदारांना मतदानासाठी आणण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.
-
उमेदवार गावात, तर मतदार शेतात
शिरोळ : सध्या ग्रामपंचायत निवडणुकीची रणधुमाळी मोठ्या प्रमाणात सुरू आहे. मतदानासाठी अवघे पाच दिवस शिल्लक आहेत. ग्रामीण भागात राजकीय वातावरण चांगलेच तापल्याने मोठ्या गावांमध्ये चांगलीच लढत होणार आहे. मतदारांच्या भेटी घेण्यासाठी उमेदवारांचा कल आहे; पण ग्रामीण भागात सध्या शेतीची कामे सुरू असल्याने उमेदवार गावात अन् मतदार शेतात, अशी स्थिती निर्माण झाली आहे.