कोल्हापूर : अनेक किल्ले पाहिले; परंतु किल्ले रायगडासारखा दुर्ग पाहिला नाही. छत्रपती शिवाजी महाराजांची ही इतक्या उंचावर वसवलेली राजधानी पर्यटनाच्या माध्यमातून जगाच्या नकाशावर आणू, अशी ग्वाही केंद्रीय पर्यटन राज्यमंत्री के. जे. अल्फोन्स यांनी दिली. रायगड विकास प्राधिकरणचे अध्यक्ष खासदार संभाजीराजे यांच्या निमंत्रणावरून अल्फोन्स यांनी शनिवारी चार तास रायगडावरून थांबून किल्ल्याची माहिती घेतली. यानंतर त्यांनी या भावना व्यक्त केल्या.
संभाजीराजे यांनी किल्ले रायगड विकास प्राधिकरणाची सूत्रे हाती घेतल्यानंतर सुमारे ६५० कोटी रुपयांची कामे मंजूर झाली असून, त्यातील मुख्य उत्खननाच्या कामाला सुरुवातही झाली आहे. सकाळी ११ वाजता अल्फोन्स यांचे रायगडावर आगमन झाले. यानंतर रायगडची तटबंदी, सदर, बाजारपेठ पाहिल्यानंतर ते भारावून गेले.
अल्फोन्स म्हणाले, देशाच्या इतिहासात मराठा साम्राज्याचे योगदान महत्त्वपूर्ण असून छत्रपती शिवरायांनी स्थापन केलेल्या स्वराज्याचा आदर्श आजच्या राज्यकर्त्यांना अनुकरणीय आहे. या गडाचा लष्करीदृष्ट्या अभ्यास करणे आवश्यक आहे. रायगडसह महाराष्ट्रातील अन्य किल्ल्यांचे नेमके सादरीकरण झाल्यास पर्यटनासाठी ते पूरक ठरणार आहे. या उत्खननाच्या माध्यमातून किल्ले रायगडच्या इतिहासावर नवा प्रकाश पडेल.पुरातत्व खात्याचे निवृत्त महासंचालक डॉ. एस. के. सिन्हा, कॅ. शिवाजी महाडकर, प्रा. रामनाथन, बिपीन नेगी, पांडुरंग बलकवडे,सुधीर थोरात यांच्यासह मान्यवर यावेळी उपस्थित होते.केंद्रीय पर्यटन मंत्री के. जे. अल्फोन्स यांनी शनिवारी किल्ले रायगडला भेट दिली. यावेळी त्यांना उत्खननामध्ये सापडलेल्या वस्तूंची माहिती रायगड विकास प्राधिकरणचे अध्यक्ष खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी माहिती दिली.