कोल्हापूर : शेतकऱ्यांच्या दिवसा वीज मागणीच्या प्रश्नाकडे महावितरणचे उच्च पदस्थ अधिकारी, ऊर्जामंत्री आणि राज्य मंत्रिमंडळातील मुख्यमंत्र्यांसह सर्वच मंत्री यांना लक्ष द्यायला वेळ नसेल तर आता शेतकऱ्यांनी “माझी शेती माझी जबाबदारी” या धोरणानुसार रात्री शेतात पाणी पाजत असताना स्वत:च खबरदारी आणि दक्षता घ्यावी. शक्यतो साप, बिबट्या, गवा, अस्वल, रानडुक्कर असे जंगली प्राणी आढळल्यास त्यांना इजा न करता त्यांना ताब्यात घेऊन सर्व सरकारी कार्यालयात आणून सोडावे, असे आवाहन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे माजी खासदार राजू शेट्टी यांनी केले.
कोल्हापुरात महावितरणच्या कार्यालयासमोर सुरू असलेल्या धरणे आंदोलनात ते बोलत होते. यावेळी ते म्हणाले, शेतकऱ्यांनी रात्रीच वीज घ्यावी असा अट्टाहास करणाऱ्या राज्य सरकारने आपली महानिर्मितीच्या मालकीची असलेली प्रतियुनिट १ रुपया उत्पादन खर्चाची जलविद्युत केंद्रे बंद का ठेवलेली आहेत, या प्रश्नाचे उत्तर द्यावे. राज्यामध्ये दररोज जवळपास २३ हजार मेगावॅट विजेचा खप आहे. पैकी महानिर्मिती ५५०० मेगावॅट एवढी वीजनिर्मिती करते. एन.टी.पी.सीकडून ४५०० मेगावॅट वीज खरेदी होते.
अद्यापही ४५०० मेगावॅट महानिर्मितीची क्षमता असणारे प्रकल्प बंद ठेवून खासगी क्षेत्रातून १३ हजार मेगावॅट एवढी वीज खरेदी केली जाते. या खरेदी पाठीमागचा सूत्रधार कोण आहे.