राम मगदूम।
गडहिंग्लज : ‘ब्रिस्क’ कंपनीच्या विनंतीनुसार गडहिंग्लज साखर कारखान्याचा ताबा १० एप्रिलपर्यंत संचालक मंडळाकडे सोपविण्याचा आदेश सहकार खात्याचे अतिरिक्त मुख्य सचिव अरविंदकुमार यांनी बुधवारी (३१ मार्चला) दिला. त्यामुळे ‘ब्रिस्क’ जाणार हे नक्की झाले. परंतु, त्यानंतर कारखाना चालविण्यासाठी दुसरी कंपनी येणार, की संचालक मंडळ स्वबळावर कारखाना चालविणार, याकडे गडहिंग्लजसह संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष आहे.
२०१३-१४ मध्ये मंत्री हसन मुश्रीफ यांनी आर्थिक अरिष्टात सापडलेला हा कारखाना शासन आदेशानुसार ‘ब्रिस्क’ला ४३ कोटींच्या बदल्यात १० वर्षांसाठी सहयोग तत्त्वावर चालवायला दिला. परंतु, कारखान्याची जुनी मशिनरी साथ देत नसल्यामुळे आणि पोषक वातावरण नसल्यामुळे मुदत संपण्यापूर्वीच कारखाना सोडण्याचा निर्णय कंपनीने घेतल्याने सहकार खात्याने त्याला मान्यता दिली आहे.
दरम्यान, सभासदांना वाटलेली सवलतीची साखर, कामगारांचे फिटमेंट, प्रदूषण नियंत्रणासाठी उभारलेला प्लँट, युनियन बँक आणि स्टेट बँकेची देणी, मशिनरीचे आधुनिकीकरण यामुळे कराराव्यतिरिक्त सुमारे ३८ कोटींचा अतिरिक्त खर्च झाल्याचे कंपनीचे म्हणणे आहे. स्वबळावर चालवायचा असेल तर कारखान्याने किंवा चालवायला घेणाऱ्यांनी ही रक्कम द्यावी, अशी ‘ब्रिस्क’ची मागणी आहे.
याउलट, तत्कालीन संचालक मंडळ आणि कंपनीतील चर्चेनुसार वाटलेल्या सवलतीच्या साखरेच्या दरातील फरकाची रक्कम विद्यमान संचालकांना मान्य नाही. ४३ कोटीपैकी ३ कोटी २६ लाख, कार्यालयीन खर्चासाठी १ कोटी २५ लाख, कामगार सोसायटीचे २ कोटी आणि कारखान्याच्या स्टोअरमधील साहित्याचे व ऊस बिलातील कपातीचे मिळून ६३ लाख अशी कोट्यवधीची रक्कम कंपनीकडूनच येणे आहे, असे कारखान्याचे म्हणणे आहे. त्यामुळे दोघांच्याही ‘येण्या-देण्या’चा विषय वादाचा ठरण्याची शक्यता आहे.
नलवडे यांचा विचारच तारेल !
१९७० च्या दशकात संस्थापक आप्पासाहेब नलवडे यांनी अवघ्या ११ महिन्यात कारखान्याची उभारणी करून सरकारचे भागभांडवल परत देण्याचा पराक्रम केला. परंतु, राजकारणी मंडळींना गेटच्या आत येऊ न देण्याच्या त्यांच्या भूमिकेमुळे तालुक्यातील सर्व पुढाऱ्यांनी एकत्र येऊन त्यांना सत्तेवरून दूर केले. त्यानंतर ‘राजकारण आणि गैरव्यवस्थापन’ यामुळेच कारखाना खासगी कंपनीला चालवायला देण्याची वेळ आली. म्हणूनच, आता पुन्हा नलवडे यांच्या विचारानेच पुढे जाण्याची गरज आहे, असे जाणकारांचे मत आहे.
गडहिंग्लज कारखाना : ०१०४२०२१-गड-०२