गडहिंग्लज : ग्रॅच्युईटी व फायनल पेमेंटची रक्कम दोन हप्त्यांत देण्याचा ब्रिस्क कंपनीचा प्रस्ताव मान्य आहे. मात्र, कारखान्याकडील थकीत रकमेसाठी धरणे आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्धार अप्पासाहेब नलवडे गडहिंग्लज तालुका सहकारी साखर कारखान्याच्या सेवानिवृत्त कामगारांनी शुक्रवारी बैठकीत केला. येथील महादेव मंदिरात सायंकाळी ही बैठक झाली. १४ जानेवारीपासून थकीत फायनल पेमेंट, ग्रॅच्युईटी आणि वेतन फरकाच्या मागणीसाठी सेवानिवृत्त कामगारांचे धरणे आंदोलन सुरू आहे. लक्षवेधी मोर्चासह चार कामगारांनी आमरण उपोषणाचा प्रयत्न केला. कंपनी व कारखान्याने आपापल्या काळातील देय रक्कम देण्याची तयारी दाखविली. तरीदेखील ठोस तारीख सांगावी यासाठी आंदोलन सुरूच राहिले.
दरम्यान, ३१ डिसेंबर २०२० अखेर कंपनीच्या काळातील सेवानिवृत्त झालेल्या २९१ कामगारांच्या ग्रॅच्युईटी व फायनल पेमेंटच्या एकूण १ कोटी ५१ लाख ४५ हजारापैकी ५० टक्के रक्कम २० फेब्रुवारी रोजी आणि उर्वरित ५० टक्के रक्कम २० मार्च रोजी, तसेच उच्च न्यायालयात प्रलंबित दाव्याचा निकाल दोन महिन्यांत लावून घेऊन न्यायालयाच्या निर्णयाप्रमाणे देय रक्कम देण्यास तयार असल्याचे लेखी प्रस्ताव 'ब्रिस्क' कंपनीने दिला, तो कामगारांनी मान्य केला.
तथापि, प्रतिष्ठेचा मुद्दा न करता कारखान्यानेही लवादाकडे दाद मागावी आणि महिनाभरात थकीत रक्कम द्यावी, अशी मागणी कामगारांनी केली. त्यासाठी धरणे आंदोलन साखळी पद्धतीने सुरूच ठेवण्याचा निर्धार बैठकीत जाहीर केला.
यावेळी संघटनेचे प्रमुख चंद्रकांत बंदी यांनी 'ब्रिस्क'च्या प्रस्तावाची माहिती दिली. बैठकीनंतर कामगारांनी महादेवाचे दर्शन घेतले आणि एकमेकांना साखर-पेढे भरवून कामगारांनी आनंदोत्सव साजरा केला.