पन्हाळा : पन्हाळ्यावर शिवदुर्ग प्रतिष्ठानच्यावतीने तटबंदीची स्वच्छता करत असताना लोखंडी फुटका तोफगोळा भिंतीत सापडला. या तोफगोळ्याचे वजन २.७६६ कि.ग्रॅ. भरले. ही माहिती सर्वत्र पसरताच तोफगोळा पाहण्यासाठी मोठी गर्दी झाली. अंधारबाव परीसरातील तटबंदीत सापडलेला हा लोखंडी तोफगोळा बाहेर काढून पुरातत्व विभागाकडे देण्यात आला.प्रत्येक सोमवारी कासारवाडी व टोप येथील तरुण रोहन चेचरे, सौरभ मुळीक, संग्राम लुगडे, सौरभ पोवार,प्रथमेश लुगडे, प्रतीक शिंदे, ओंकार जाधव, दिपक मुळीक, प्रताप वरिंगे, ऋषिकेश कुशिरे, गौरव शिंदे, सागर कोळेकर, विकी भोसले, बारक्या सुतार, पन्हाळा तटबंदी व परीसर पुरातत्व विभागाच्या परवानगीने स्वच्छ करत असतात. आज, अंधारबाव परीसरातील तटबंदीची स्वच्छता करताना त्यांना लोखंडी तोफगोळा दिसला.याबाबत पुरातत्व संशोधक सचिन भगवान पाटील यांनी सांगितले की, पन्हाळा किल्ल्याच्या तीन दरवाजा परिसरात इमारती पाडण्यासाठी १८४४ साली तोफखान्याचा मारा झाला. आजही तीन दरवाजाच्या बाहेरील बाजूच्या दरवाजाच्या कमानीवर तोफगोळ्यांचा मारा झाल्याच्या काही खुणा स्पष्ट दिसतात.काही अभ्यासकांच्या मते दरवाजावरील तोफेच्या माऱ्याची खूण ही पन्हाळा किल्ल्यावर सिद्दी जौहरने घातलेल्या वेढ्यातील इंग्रज अधिकारी हेली रेव्हिंग्टनने राजापुरातून आणलेल्या तोफांची आहे, पण सन १६६० मध्ये इंग्रज सैन्याकडील तोफखाना इतका अद्ययावत नव्हता. सन १८४४ साली इंग्रजांनी वापरलेल्या तोफा या अद्ययावत व लांब पल्ल्यावर मारा करणाऱ्या व लोखंडी तोफगोळे त्यांच्याकडे होते. त्यामुळे तीन दरवाजावरील जी तोफेच्या माऱ्याची खूण आहे, ती सन १८४४ च्या युद्धातील ब्रिटिश सैन्याच्या किल्ल्यावरील कार्यवाह्या व त्यांची काही रेखाचित्रे भारताचा इतिहास व १९व्या शतकातील युनायटेड स्टेट ऑफ अमेरिका येथील ब्राऊन मिलिटरी कलेक्शन या मथळ्याखाली ब्राऊन युनिव्हरसिटी येथील संशोधनातून हे सिद्ध होत.
पन्हाळ्याच्या तटबंदीत सापडला ब्रिटिश कालीन तोफगोळा
By ऑनलाइन लोकमत | Published: March 28, 2022 6:05 PM