मानाजी धुमाळ -- रेठरेधर--ब्रिटिशकालीन रेठरेधरणाचे पुनरुज्जीवन करण्यात येणार असून १९४५ मध्ये दगडी बांधकामात बांधण्यात आलेल्या या बंधाऱ्याच्या पात्रातील गाळ काढण्यात येणार आहे. बंधाऱ्यात पाणी अडविण्यासाठी मच्छाला दरवाजे बसविण्यात येणार आहेत.ब्रिटिश राजवटीत रेठरेधरण परिसरातील शेतकऱ्यांच्या शेतीला पाटाने सायफन पध्दतीने पाणी देण्यासाठी, गहू, शाळू, हरभरा या पिकांसाठी पाणी देण्यासाठी ओढा अडवून १९४५ मध्ये त्यावेळेचे सरपंच रंगराव ज्योती पाटील यांनी ब्रिटिश सरकारकडून हा बंधारा बांधला होता.तिळगंगा ओढ्याच्या पात्रामध्ये रेठरेधरण गाव पुलाच्या उत्तरेला विश्वास पाटील यांच्या घराजवळ हा बंधारा असून, याचे संपूर्ण बांधकाम घडविलेल्या दगडांपासून केले आहे. बंधाऱ्याची पूर्व-पश्चिम लांबी सुमारे १५0 फूट आहे व बंधाऱ्याचे पात्र सुमारे १00 मीटरपेक्षा जास्त आहे. या बंधाऱ्याला दोन दरवाजे आहेत. बंधाऱ्यात पाणी अडविल्यानंतर अडविलेले पाणी बंधाऱ्याच्या पश्चिमेकडील दरवाजामधून बाहेर पडण्याची सोय आहे. हे पाणी पाटाने सुमारे २ कि. मी. पर्यंत शेतीला जाण्याची सोय होती. या बंधाऱ्यास पूर्वी धरण म्हणून ओळखले जात होते. त्यावरुन रेठऱ्याचे नाव रेठरेधरण पडले.सध्या बंधाऱ्याचे बांधकाम चांगल्या स्थितीत असून, मच्छाला दरवाजे नाहीत व बंधाऱ्यातून बाहेर पडणाऱ्या पाण्याच्या पाटाचे अंतर सुमारे २ कि. मी. असून, हा पाट बहुतांशी ठिकाणी बुजला आहे. बंधाऱ्याच्या पात्रामध्ये गाळ साचला असून, झुडपे उगवली आहेत. या बंधाऱ्याच्या दुरुस्तीसाठी ‘लोकमत’ने वेळोवेळी वृत्त प्रसिध्द केले होते.जिल्हा परिषद सदस्य रणधीर नाईक यांनी प्रांताधिकारी डॉ. विजयसिंह देशमुख, वाळवा तालुक्याच्या तहसीलदार सौ. रूपाली सरनोबत तसेच पाटबंधारे विभागाच्या सर्व अधिकाऱ्यांना बोलावून रेठरेधरण बंधाऱ्याच्या पुनरुज्जीवनासाठी पाहणी केली. लवकरच बंधारा पात्रामधील गाळ काढणे, दरवाजे बसविणे आदी कामे सुरू होतील. रेठरेधरण येथील बंधारा शेतकऱ्यांसाठी अत्यंत फायद्याचा आहे. यामधील गाळ काढून पोटकालवा पुनरुज्जीवित करणे, धरणाची दुरुस्ती करणे आदी कामे जलसंधारण योजनेतून करण्यात येणार आहेत. हा बंधारा सुरु झाल्यानंतर शिवारातील रब्बी पिकांना लाभ होणार आहे. तसेच विहिरींच्या पाणी पातळीतही वाढ होणार आहे.- रणधीर नाईक, जि. प. सदस्यब्रिटिशकालीन बंधाऱ्याचे बांधकाम ७० वर्षांनंतरही सुस्थितीत आहे. बंधाऱ्याचे पुनरुज्जीवन करण्यासाठी आम्ही पाठपुरावा करत आहोत. सायफन पध्दतीने शेतीला पाणी मिळणार असल्याने रब्बी पिकांसह या पाण्याचा जमिनीत निचरा होऊन विहिरींच्या पाणी पातळीत वाढ होऊन दुहेरी फायदा होणार आहे.- संजय घोरपडे, संचालक शिवाजी केन प्रोसेसर्स, शिराळा.
ब्रिटिशकालीन रेठरेधरणाचे लवकरच होणार पुनरुज्जीवन!
By admin | Published: October 04, 2015 10:39 PM