बेळगाव : इंग्लंडमध्ये कोरोनाचा कहर सुरू असून हजारो रुग्ण कोरोनामुळे दगावले आहेत. परिणामी खबरदारी म्हणून भारत सरकारने इंग्लंडहून भारतात येणाऱ्या विमान सेवेवर बंदी घातली आहे. या पार्श्वभूमीवर ब्रिटनहून आलेल्या एका महिलेला बेळगावमध्ये आयसोलेट करण्यात आले आहे.
लंडनहून बेळगांवमध्ये आलेल्या एका महिलेच्या घशातील स्त्रावाचे (स्वॅब) नमुने घेऊन तिला बेळगांवात आयसोलेट करण्यात आले असल्याची माहिती वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिली आहे. इंग्लंडमध्ये कोरोनाचा हाहाकार सुरू असताना तीमहिला बेळगांवात आली आहे. बेळगाव विमानतळावर तिच्यात कोरोनाची लक्षणे आढळल्याने आरोग्य खात्याने तिच्यावर संपूर्ण लक्ष केंद्रित केले आहे.
१४ डिसेंबर रोजी ही ३५ वर्षीय महिला लंडनहून बेंगलोरला आली होती. त्यानंतर ती जमखंडीला जाण्यासाठी बेळगांवात आली होती. याबाबत बेळगांव आरोग्य खात्याशी संपर्क साधला असता तिचे असे नमुने घेऊन तपासणीसाठी प्रयोगशाळेकडे पाठविण्यात आले असल्याचे सांगण्यात आले. आज सायंकाळी किंवा उद्या तिच्या स्वॅबच्या नमुन्याचा अहवाल हाती येणार आहे. सध्या संबंधित महिलेला घरातच राहण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे. आपल्या पतीसमवेत ती महिला बेळगावात आली असून त्यांची मुले इंग्लंडमध्ये आहेत.
दरम्यान, लंडनहून नवी दिल्ली येथे आलेल्या ५ जणांना कोरोनाची बाधा झाल्याचे स्पष्ट झाले आहे.