आॅनलाईन लोकमत
कोल्हापूर, दि. २७ : थेट पाईपलाईन योजनेतील अनेक कामांची ढोबळमानाने अंदाजपत्रके तयार करण्यात आली आहेत. त्यामुळेच प्रत्यक्ष २५ लाखांच्या उड्डाणपुलासाठी २ कोटी ४८ लाख रुपयांचे बिल देण्यात आले, अशी धक्कादायक कबुली महानगरपालिका उपायुक्त विजय खोराटे यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत बोलताना दिली; परंतु यापुढे अशी चूक होणार नाही. कन्सल्टंटकडून चौकशी अहवाल येताच अंदाजपत्रकात फेरफार करण्यात येईल, असे खोराटे यांनी स्पष्ट केले.
उपमहापौर अर्जुन माने, स्थायी समितीचे सभापती डॉ. संदीप नेजदार व गटनेते शारंगधर देशमुख यांनी पत्रकार परिषदेत उपायुक्त विजय खोराटे, प्रभारी जल अभियंता सुरेश कुलकर्णी व युनिटी कन्सल्टंटचे राजेंद्र कुलकर्णी यांना बोलावून घेतले होते. यावेळी पत्रकारांनी खोराटे व कुलकर्णी यांना विविध प्रश्न विचारले.
खोराटे यांनी सांगितले की, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण व महानगरपालिका यांनी ‘युनिटी’कडून थेट पाईपलाईनचा ‘डीपीआर’ तयार करून घेतला. त्यांनी केलेल्या योजनेतील काही कामांची अंदाजपत्रके ढोबळमानाने केली आहेत. ठिकपुर्लीजवळील उड्डाणपुलाचे काम हे त्यांपैकीच एक आहे. अंदाजपत्रकात त्याची किंमत ढोबळमानाने अडीच कोटी धरण्यात आली; परंतु प्रत्यक्षात खर्च २५ लाखांच्या आसपास आलेला आहे. आणखी उड्डाणपुलासाठी असेच ढोबळ अंदाजपत्रक तयार केले आहे; पण ही कामे अजून पूर्ण झालेली नाहीत.
धरणाच्या बॅकवॉटरमध्ये कॉपरडॅम्प टाकणे आणि डी-वॉटरिंग करणे या कामांची अंदाजपत्रकेही अशीच ढोबळपणे केली आहेत. ही चूक आधी आमच्या लक्षात यायला पाहिजे होती; पण ती आता आली आहे. त्यामुळे आता त्यात फेरफार केले जातील. टेंडरमधील किंमत आणि प्रत्यक्ष येणारा खर्च यांचा ताळमेळ घालून त्यात बदल केले जातील. ठिकपुर्लीजवळील उड्डाणपुलावर अव्वाच्या सव्वा रक्कम खर्च पडल्याचे उपायुक्त खोराटे यांनी कबूल केले.
यावेळी कन्सल्टंटचे प्रतिनिधी राजेंद्र कुलकर्णी यांना पत्रकारांनी अनेक प्रश्न विचारले; पण एकाही प्रश्नाचे उत्तर त्यांनी दिले नाही. झालेल्या कामाचे बिल देण्यापूर्वी थर्ड पार्टी आॅडिट केले जाते का, असा प्रश्न जलअभियंता सुरेश कुलकर्णी यांना विचारला असता त्यांनी ‘होय’ असे सांगितले. पुणे इंजिनिअरिंग कॉलेजमधील डॉ. हेडाऊ यांनी असे आॅडिट केले आहे; पण त्यांच्याकडूनही चुकीच्या अंदाजपत्रकावर आक्षेप घेण्यात आला नाही, असे कुलकर्णी यांनी सांगितले. (प्रतिनिधी)
पगारातून वसुली करावी चुकीच्या पद्धतीने उड्डाणपुलाचे बिल अदा केले असल्याने त्याची वसुली कन्सल्टंट यांच्याकडून तसेच महापालिका अधिकाऱ्यांच्या पगारातून करावी, अशी मागणी कॉँग्रेस पदाधिकाऱ्यांनी केली आहे.